बीडच्या मुळुकवाडी येथे 2022 मध्ये झालेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात आरोपी रोहिदास निर्मळ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी प्रभावी बाजू मांडली.
बीडमध्ये गाजलेल्या मुळुकवाडी हत्या प्रकरणाचा निकाल
बीड — तालुक्यातील मुळुकवाडी येथे 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या बळीराम निर्मळ हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत मुख्य आरोपी रोहिदास निर्मळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रथम सत्र न्यायाधीश पाटवदकर यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. मिलिंद केशवराव वाघीरकर यांनी काम पाहिले.
सकाळच्या वेळी कोयत्याने हल्ला
घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास केशरबाई बळीराम निर्मळ या घरासमोर मूग पाखडत बसल्या होत्या, तर कांताबाई निर्मळ या घराच्या ओट्यावर दात घासत होत्या. त्याचवेळी आरोपी रोहिदास निर्मळ हा कोयता लपवून घरासमोर आला आणि अचानक केशरबाई यांच्या डोक्यावर व तोंडावर वार करण्यास सुरुवात केली.

आरडाओरड ऐकून बळीराम निर्मळ घटनास्थळी धावत आले असता आरोपीने त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या बळीराम निर्मळ यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेत केशरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार करण्यात आले. कांताबाई निर्मळ यांच्यावर बीडमध्ये उपचार करण्यात आले.
नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी कांताबाई निर्मळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 267/2022 अंतर्गत भारतीय दंड विधान कलम 302, 307, 326, 324, 109 आणि 115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख आणि हजारे यांनी केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाने एकूण 13 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, जखमी महिला, पंच, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सरकारी पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी रोहिदास निर्मळ याला दोषी ठरवले. न्यायालयाने कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड, कलम 307 अंतर्गत 10 वर्षांची शिक्षा व 2 हजार रुपये दंड, तर कलम 326 अंतर्गत 3 वर्षांची शिक्षा व 10 हजार रुपये दंड सुनावला.
दरम्यान, आरोपीचे आई-वडील विठ्ठल आणि कौसाबाई यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
खटल्यात विशेष सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची
या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद वाघीरकर यांना अॅड. संदीप जोगदंड, अॅड. सोंडगे, विधी विद्यार्थी अभिषेक अवताडे आणि पैरवी अधिकारी गव्हाणे यांचे सहकार्य लाभले.




