अंबाजोगाई — पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता बीड जिल्ह्यात नवे धागेदोरे मिळत असून, पालकांसह विद्यार्थ्यांची देखील “नीट ” नेटकी होताना दिसून येत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे पालक व दोन विद्यार्थ्यांना घरातून दुसरीकडे घेऊन जात ही चौकशी करण्यात आली. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा NEET परीक्षेला बसली होती, तर भाऊ पहिल्यांदाच परीक्षा देत होता. धक्कादायक बाब म्हणजे कथितरित्या हा पेपर या दोघांसाठीच मिळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची चर्चा आहे.
CBI च्या चौकशीनंतर अंबाजोगाई परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणातून आणखी मोठे शैक्षणिक रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून शैक्षणिक नेटवर्कसह पालकांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नीट घोटाळ्याचा कथित मास्टरमाईंड म्हणून चर्चेत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर हा ‘ब्रँड अँबेसिडर’ असल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या लेटरहेडवर मोटेगावकरचा ‘ब्रँड अँबेसिडर’ असा उल्लेख आढळून आला. यामुळे संशय अधिक गडद झाला आहे.
यामुळे मोटेगावकरशी संबंधित कोचिंग क्लास चालक आणि शैक्षणिक नेटवर्कही आता तपासाच्या रडारवर आले आहेत.बीड मधील शाहूनगर परिसरात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून, या क्लास चालकांचे मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी पेपरफुटी संदर्भात काही व्यावसायिक हितसंबंध होते का, याचीही CBI कडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना आता बीड जिल्ह्यातील या नव्या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील काळे धंदे आणि कोचिंग माफियांचे कथित जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हे जाळे केंद्रीय अन्वेषण विभागाने उध्वस्त करून टाकावे अशी मागणी केली जात आहे.

