बीड — तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करून त्याच्या अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही समाजकंटकांनी प्रकरणाला धार्मिक रंग देऊन गावातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या तत्परतेमुळे अवघ्या तासाभरात तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि गावातील तणाव नियंत्रणात आला.

काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास खामगाव येथील फरांडे वस्ती परिसरात रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू होते. फिर्यादी शाहरुख रहिमान पठाण हे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील खडी पांगवत होते. त्यावेळी आरोपी प्रल्हाद केशव भावले हा ट्रॅक्टर घेऊन त्या रस्त्याने जात होता.
“जेसीबी मशीन आडवी का लावली?” या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी प्रल्हाद भावले याने तांब्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीला धार्मिक शिवीगाळ करत डिझेलच्या कॅनमधील इंधन अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत शेख फैजान करीम हाही जखमी झाला असून जखमी शाहरुख पठाण यांच्यावर लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तात्काळ गुन्हा दाखल; तीन आरोपी अटकेत
घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करत प्रल्हाद केशव भावले, सोमदेव भावले आणि केशव भावले या तिघांना तासाभरात अटक केली.
धार्मिक तणाव पसरविण्याचा प्रयत्न हाणून पाडला
घटनेनंतर काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवत या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे गावातील संभाव्य तणाव टळला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस हवालदार प्रसाद कदम, विजय जाधव, सतीश मुंडे आणि युवराज चव्हाण यांच्या पथकाने केली.
इतक्याच तत्परतेची गरज
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस दलाला आधुनिकीकरणाचा फायदा कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले असले तरीही गुन्हेच दाखल केले जात नाहीत जनतेला न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आंदोलन करावे लागते तर आधुनिकीकरणाचा काय फायदा असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली तत्परता अशीच सुरू ठेवली तर बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीला आळा बसायला व धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रश्न तयार होणारच नाहीत अशी प्रतिक्रिया देऊन पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.




