बीड — कारखान्यांना गाळपासाठी ऊस देवून दीड दोन महिन्यांनंतरही काटखान्यांकडून पैसे मिळत नसल्याने किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आणि जिल्हाधिकाऱ्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकरी प्रश्नावरील या उदासीन भूमिकेचा निषेध करत किसान सभेचे शिष्टमंडळ चर्चेविनाच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर पडले. याच्या शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर जिल्हयातील प्रशासन हे साखर कारखानादाराचे कटपुतली आहे का? असा घणाघाती सवाल राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी या प्रसंगी केला.
वृक्ष लागवडीचा इव्हेंट साजरा करून चमकोगिरी चा पॅटर्न राबवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात काम करत असल्याचा विसर पडला. शेतकरी प्रश्नावर मात्र त्यांच्यातला विवेक हरवल्याच विदारक चित्र पाहायला मिळालं. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर अळवला जात आहे.

सरकारने कर्जमाफी, पीकविमा, अतिवृष्टी अनुदान याबाबत केलेले फसवे दावे याबाबत किसान सभा राज्यभर आंदोलनाची सुरुवात बीड मधून करणार असल्याचे या प्रसंगी डॉ.नवले यांनी सांगितले. विविध प्रश्नाला घेत अखिल भारतीय किसान सभेने बुधवार दि 1 रोजी रखरखत्या उन्हात कलेक्टर कचेरीवर धडक मोर्चा काढला.
पिक विमाधारक सर्व शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणात १७५०० रु. पेक्षा जास्त अथवा अतिवृष्टी नुकसानाच धरतीवर घोषित केल्याप्रमाणे किमान १७५०० रुपये सरसकट पिकविमा मिळावा, शासनाने घोषित केलेले अतिवृष्टी अनुदान सर्व वंचित शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत सर्व अडचणींचे निराकरण करून मिळायलाच हवे, मागच्या तीन-चार महिन्यापासून जिल्ह्यातील विविध कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाही ही ऊस बिलाची रक्कम पुढच्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळणे अजून बाकी आहे. त्यासाठी शासनाने अशा शेतकऱ्यांना घोषित केलेली मदत १० एप्रिल पर्यंत वितरित करावी.या मागण्या घेत जिल्ह्यातील शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली बुधवार दि १ रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेचे राज्य सचिव कॉ.डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी शेतकरी विरोधी भुमीका घेत कसल्याही प्रकारची आश्वासक, सुसंवादी, आकडेवारीनिहाय चर्चा न करता वेळ काढुपणा करत थातूरमातुर उत्तरे देत अप्रत्यक्षपणे साखर कारखानदारांची पाठराखण करत असल्याचे शिष्टमंडळाच्या लक्ष्यात आल्याने शेतकरी आणि शिष्टमंडळ संतप्त होत चर्चेविना दालनाबाहेर पडले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना डॉ.नवले यांनी ऊस देयक अदा प्रश्नी जिल्ह्यातील प्रशासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या अस्मानी आणि सुलतानी संकटात एकजुटीने पूर्ण ताकदीने लढा उभारण्याची वेळ आली असून फसवी कर्जमाफी, पीक विमा ऊस दर यासह इतर प्रश्नावर किसान सभा राज्यभर आंदोलन करणार असून त्याची सुरुवात बीड मधून करण्यात येईल असे ही सांगितले.
या प्रसंगी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ऑड.अजय बुरांडे यांनी साखर कारखानदार ऊस रिकव्हरी लपवून शेतकऱ्यांची होणारी लूट रोखण्यासाठी अनेक आंदोलने करून दर वाढवून घेतला मात्र नियमानुसार गाळप पश्चात 15 दिवसात देयक अदा करणे बंधनकारक असताना अद्याप ऊस देयक अदा केले नसल्याने शेतकरी आक्रमक असल्याचे सागितले.
या प्रसंगी कॉ.मुरलीधर नागरगोजे, मोहन जाधव, रोहिदास जाधव, कृष्णा सोळंके, भगवान बडे, बालाजी कडभाने, विष्णू देशमुख आदींसह अनेक पदाधिकारी, युवा शेतकरी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

