बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस प्रशासन किती लोकाभिमुख केलं याची टिमकी नववर्षाच्या स्वागताला वाजवली त्याचा भांडाफोड करण्याची वेळ आली आहे.एसपींच्या खास मर्जीतले नेकनूर चे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी 78 वर्षीय अंजना बन नावाच्या आज्जीला न्यायासाठी आत्मदहन करण्याची वेळ आणली आहे. 11 जानेवारीला नेकनूर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा 10 दिवसापूर्वीच देऊनही पोलीस अधीक्षकांनी देखील कुठलीच दखल घेण्याची तसदी घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे.
. बीड जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबार, अपहरण, राजरोस चालणारे अवैध धंदे यांच्यापुढे हे प्रकरण तसं पाहिलं तर अतिशय क्षूल्लक आहे.पण पोलीस अधीक्षकांनी नववर्षाच्या स्वागतालाच किती लोकाभिमुख कामं केली आहेत.पोलीस प्रशासन किती सतर्क आहे. याचा ढोल वाजवला. तो वाजवायला ही हरकत नाही. पण कायदा सुव्यवस्था आणि एस पी चा आदेश कितपत मानला जातो. हा खरा प्रश्न सगळ्याच परिस्थितीतून निर्माण होतो. एसपींनी मर्जीतली माणसं अनेक ठिकाणी जनतेच्या माथी बळच मारली. अनेक वेळा कंट्रोलला बसवा असे सांगूनही एसपींनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. मग काय? नंगा नाच करायला अख्खं रान यांना कमी पडू लागलं. अवैध धंद्यांची भरमार झाली. त्यातून स्वतःचे बंगल्यांचे इमले बांधले गेले. ही कहाणी आहे एसपींच्या मर्जीतल्या नेकनूरच्या ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी ची त्याच्या अकार्यशैलीची गौरव गाथा माध्यमांनी अनेक वेळा मांडली.पण पिंडीवरच्या विंचवाला ठेचायचं कसं हे माध्यमांना देखील कळालं नाही. शेवटी अनेकांनी आपल्याच पापाचे भोग आहेत म्हणून घडतय ते घडू द्या म्हणून गोसावी चा नंगानाचाकडे दुर्लक्ष केलं.पण लोकाभिमुख प्रशासनाचा ढोल वाजवला त्यामुळे सत्य सांगण्यासाठी अशा गोष्टी पुढे आणण्याची वेळ “सह्याद्री माझा”वर आली.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घारगाव येथील अंजना दगडू बन या 78 वर्षाच्या आज्जीवर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ चंद्रकांत गोसावी यांनी आणली अंजना बन या गावाकडे एकट्याच राहतात परडी चा जोगवा मागून उदरनिर्वाह करतात परडी हेच एकमेव त्याचं जगण्याचं साधन. घरी कुणीच नसल्यामुळे मंदिरात झोपण्याच्या कारणावरून गणेश अंकुश सपकाळ याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. नुसती धमकीच दिली नाही तर नाकातली सोन्याची “मोरणी” काढून घेतली. याची रीतसर तक्रार नेकनूर पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीला दीड महिना उलटून गेला मात्र कुठलीच कारवाई झाली नाही. चौसाळा पोलीस चौकीचा जमादार गर्जे याने तक्रार करणाऱ्या आज्जीलाच दापदडप करायला सुरुवात केली. “चोराला मेसाई धार्जिन” या म्हणीप्रमाणे “चोराला गोसावी धार्जीन” असं म्हणण्याची वेळ आणली. आज्जीने चंद्रकांत गोसावी ची देखील भेट घेतली. नातवासारख्या असलेल्या गोसावींनी देखील आज्जीची फरपटच केली. गर्जेची व आरोपीची बाजू घेतली. शेवटी अंजना बन यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी येत्या आठ दिवसात गर्जे साहेब व गोसावी तसेच आरोपीवर कारवाई केली नाही तर 11 जानेवारी 2026 ला नेकनुर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याच निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं. पोलीस अधीक्षकांनी देखील पिंडीवरच्या विंचवालाच नेहमीप्रमाणे वरदान दिलं. निवेदन देऊन दहा-बारा दिवस होत आले तरी कुठलीच कारवाई कांवत यांनी देखील केली नाही. आत्मस्तुतीच्या ढोलाच्या आवाजात म्हाताऱ्या जोगवा मागून खाणाऱ्या निराधार आज्जीची आर्त हाक स्वतःला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या कानावर गेली नाही. जर इतकी बिकट परिस्थिती असेल तर पोलीस अधीक्षकांनी प्रशासनाला लोकाभिमुख केल्याचे ढोल वाजवणं बंद करावं अशी मागणी जनतेतून केली जाऊ लागली आहे.

