हिंगोली — राज्यात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण असताना हिंगोलीतून मोठी बातमी समोर आली. राज्यात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त हिंगोली पोलिसांनी जप्त केली आहे.
हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील शेतकरी भवन परिसरातून ही रोकड एका चारचाकी गाडीत सापडल्याचं समोर आलंय. पैशांची इतकी मोठी बॅग कारमधून सापडताच परिसरात चांगलाच खळबळ उडाला. ही रक्कम कोणाची? कुठून आली? आणि कुठे जाणार होती? याबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी रोकड आढळताच तात्काळ निवडणूक विभागाला कळवलं आणि त्यानंतर भरारी पथकानं ही रक्कम आपल्या ताब्यात घेतली. आता संपूर्ण पैशांसंबंधी कागदपत्रांची आणि व्यवहाराची कसून पडताळणी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे चर्चांना उधाण आलं असून प्रशासनाची धावपळही वाढली आहे.

