कांवत साहेब..! पांढऱ्या बगळ्याने सौंदर्य वाढवलं; पण माशांनी तलावाला नासवलं त्याचं काय?

बीड — एस पी साहेब..! पांढरा शुभ्र बगळा पाण्यात एका पायावर ध्यानस्थ उभा आहे. दुरून पाहिलं तर तलावाच्या सौंदर्यात कैकपटीने त्याने भर पाडली. पण तो नुसताच ध्यानस्थ आहे. त्याचं कर्म करायला विसरल्यामुळे तलावातील माशांनी अख्खा तलावच घाण करून टाकला आहे. निसर्ग चक्र बिघडलं तलावा ची दुर्गंधी‌ नाक मूठीत धरायला लावणारी असताना नुसताच सौंदर्यवान बगळा काय कामाचा असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.ही स्थिती बीड शहरातील पोलीस दलाची बनली आहे.
एस पी साहेब…! तुम्ही प्रामाणिक आहात याबद्दल बीडकरांच्या मनात थोडी सुद्धा शंका येत नाही. तितका विश्वास जनतेचा तुमच्यावर आहे. पण बीड शहराची परिस्थिती तलावातल्या माशांनी वाईट करून ठेवली आहे. त्या तलावाची दुर्गंधी वरचे वर पसरू लागली आहे‌. या माशावर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल ,त्यांच्यावर विश्वास असला तरी या दुर्गंधीचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात शहर पोलीस ठाणे हद्दीतील झमझम कॉलनीतील गुटखा गोदामावर धाड टाकली होती. याच प्रकरणात ज्या आरोपीचे हे गोदाम आहे. त्याच्याच माणसाला जवळपास महिन्यापूर्वी एका नव्या पोलीस कर्मचाऱ्याने पकडून शहर पोलीस ठाण्याला नेलं. तो मोटार सायकल वरून नगर रोड वरून गुटखा तस्करी करत होता.त्याला ‌ शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाताच गोदाम मालकाने शहर पोलीस ठाणे गाठत ठाणे प्रमुखा पासून हप्ते गोळा करायला येणाऱ्या प्रत्येकाला शिव्यांची लाखोळी वाहीली. शेवटी या प्रकरणात मांडवली झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मात्र याचा मास्टरमाइंड कोण ? याचा तपास करावा. कारवाई करावी हे “शितल”डोक्यात आलं नाही. शेवटी “मेहुणी बायको मिंधा संसार” यालाच म्हणतात. या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा देखील झाली.
याच मास्टरमाईंडच्या गोदामावर शेवटी एलसीबीला कारवाई करावी लागली.सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची तसदी एस पी साहेब आपण घेतली तर सत्य उघडकीस येईल. पण”शितल”डोक्याने आपल्याच म्हणण्याला “बल”लावत “लाळ” टपकवत यावर मधुर वाणीच्या चार शब्दांनी पांघरून घालण्याचं काम देखील ठाणे प्रमुखांकडून केलं जाईल.आजपर्यंत तेच केलं गेलं. त्यामुळेच बस स्थानकासमोरील भागात अवैध धंद्यांचा बाजार खुलेआम भरलेला आहे.
महिलांची लफडी असोत की आठवले गॅंगवर कारवाई करताना वायरल झालेले व्हॉइस काॅल रेकॉर्डिंग यासारख्या अनेक कुटान्यात वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेल ते व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक वेळी पांघरून घालण्याची भूमिका वरिष्ठांनी घेतल्यामुळे आपलं काहीच वाकड होत नाही. दोन-चार गोड गोड शब्द बोलले की काम भागत हे चांगलं माहित आहे. त्यामुळेच की काय पत्रकारांना दिवाळीची भेट देण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांकडे स्पॉन्सरशिपची भीक मागितली. अर्थातच हे व्यापारी प्रामाणिक व्यापार करणारे निश्चितच नाहीत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. “शितल” डोक्याने मागणी केली अन् ती पूर्ण होणार नाही. असं कसं शक्य होईल? इतकी वर्ष बीड मध्येच रहाण्याच्या अट्टाहासाचा उपयोग काय? नाड्या माहीत आहेत म्हणूनच ना! मग काय मुक्तहस्ताने पत्रकारांच्या नावावर भेट वस्तूंची उधळण झाली गेली.काही मर्जीतील पत्रकारांना ती वाटपही केली गेली असंही सांगितलं जात. गोळा झालेल्या भरमसाठ मलीद्यावर स्वतःच डावही साधला यापेक्षा आणखी वेगळं काय करावं? यामध्ये हकनाक पत्रकार बदनाम झाला. जे यांच्याकडे गेले त्या पत्रकारांना मात्र साहेब फार टाईट आहेत. यावेळी काहीच मिळणार नाही त्यांचे आदेश आहेत असं म्हणून तोंडाला नेहमीप्रमाणेच पान पूसली. पत्रकारांच्या नावावर वसुलीला मात्र चिल्लर पान टपरी यांनी सोडली नाही. पत्रकारांच्या नावावर घडलेल्या या कांडाची चर्चा शहरात चविने चर्चीली जात आहे.बारकाईने चौकशी केली तर या प्रकरणातील सत्यताही बाहेर येईल. पण अवैध धंद्यांचा नंगानाच सुरू असताना त्याकडे लक्ष द्यायला एसपींना वेळ नाही किंवा त्याची गरजही वाटत नाही तिथे असल्या फुटकळ गोष्टींकडे ते काय लक्ष देणार? तो आपला विषयच नाही म्हणून हात झटकले जाणार.
चक्री जुगार, गुटखा, मटका, पत्याचे क्लब, अवैध दारू विक्री, नशेली पदार्थ, यासारखे सगळेच अवैध धंदे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत तर पोलिसांनी गुन्हेगार हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. कायदा सुव्यवस्था “मोडी”त काढून “राज” करण्याची वृत्ती बळावल्याने मोडीराज सुरू आहे. चक्री जुगार जोरात सुरू आहे. इथे सामान्यांच्या न्यायाला स्थान नाही अशी स्थिती बनली आहे.
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतही अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. इथल्या ठाणे प्रमुखांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढायला सुरुवात केली आहे. परिणामी मिसरूड न फुटलेली पोरं देखील गावठी कट्टे घेऊन फिरत आहेत. एसपी ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर रहदारीच्या रस्त्यावर खून पडत आहेत. कायदा सुव्यवस्थेची विल्हेवाट लावून तलावात घाण करण्याची या बड्या माशांची जणू स्पर्धाच लागली आहे. नशेचा कारभार जोरात सुरू आहे. वर्तमानपत्राचे रकाने भरत असले तरी याकडे लक्ष द्यायला एसपींना देखील वेळ नाही‌‌. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली पिढी नशेच्या बाजारात झिंगत फिरत आहे. नशा युक्त फुलचंद पानावर बंदी असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. चार दोन फुटकळ कारवाया एसपींना दिसण्यापुरत्या झाल्या. एस पी खुश झाले. पुन्हा फुलचंद पानाचे तरुण चाहते झाले.अशीच स्थिती नेकनुर ची आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यांची आहे.तलावातील बड्या माशांची पोट तुडुंब भरली जात असली तरी सर्वसामान्य जनतेचं मात्र अवघड होऊन बसल आहे. मग एस पी साहेब तुम्हीच सांगा या बड्या माशांचं करायचं काय? त्यांनी दुर्गंध पसरून खराब केलेल्या तलावाचं काय? ती तुमच्या पायाशी लोळण घेतात त्यांचा धिंगाणा सुरू असला तरी तुम्हाला त्या आवडतात. किती ती लीन आहेत? किती ते पायाशी लाडीक चाळा करत आहेत? किती मी ध्यानस्थ तपस्वी आहे की हे मासे माझ्या पायाशी लोळण घेत आहेत या भ्रमातून तुम्ही बाहेर कधी येणार?

कुठपर्यंत पांढऱ्या शुभ्र बगळ्याची भूमिका घेऊन ध्यानस्थ पायावर उभे राहणार? यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना शिस्त कधी लावणार? कायदा सुव्यवस्थेने समाज व्यवस्थेच वाढणार सौंदर्य कधी पूर्ववत होणार? अशीच स्थिती कायम राहिली तर तुमच्या प्रामाणिकपणालाही कुठला आजचा अर्थ राहणार नाही. शेवटी तुमच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला वेळ लागणार नाही याची खबरदारी आता तरी घ्या?
या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला बीडच्या जनतेला द्यावीच लागणार

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles