राजकारण्यांच्या कर्तबगारीने बीड आधीच आत्महत्यांचा हॉटस्पॉट; अजित दादा..! किती बळी गेल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करणार ??

बीड — राजकारण्यांनी नेहमीच बीड जिल्हा मागास ठेवण्याची कर्तबगारी केली त्यातूनच शेतकरी आत्महत्यांचा हॉटस्पॉट बनला गेला. अव्याहत आत्महत्यांच सत्र सुरू असलं तरी सत्ताधाऱ्यांना फरक पडला नाही. त्यातच आता अतिवृष्टीने होतं नव्हतं ते स्वप्न चिखलात रुतून गेलं. नदी काठची गावच नाही तर प्रत्येकाच्या जमिनीच शेत तलावात रूपांतर झालं. सरकारकडे सॅटॅलाइट इमेज उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यमं रोज इथल्या भीषण परिस्थितीचं भिषण वास्तव मांडत आहेत. शेतकऱ्यांचा डाटा सरकारकडे आहे‌. अतिवृष्टीची आकडेवारी उपलब्ध आहे. मग सरकार कशाची वाट पाहत आहे. अजितदादा…!शेतकऱ्यांच्या भळभळणाऱ्या जखमा पूरग्रस्त पाहणी दौरा करून आणखी खरवडायचा मंत्र्या संत्र्यांनी चंग बांधला आहे काय? तुम्ही बीडमध्ये मुक्कामाला येण्यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी किती आत्महत्या झाल्यावर सरकारी मदतीची ओला दुष्काळाची घोषणा करणार आहात हे बीडच्या जनतेला एकदा सांगाच…!
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या बीडची ओळख आत्महत्यांचा जिल्हा म्हणून सध्या तरी होऊ लागली आहे. राजकारण्यांची खुर्चीसाठी धावपळ आहे. पण इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळावी यासाठी कितीही भक्कमपणे एखाद्या राजकारणी ,पक्षाच्या मागे इथला शेतकरी उभा राहिला तरी निराशे शिवाय पदरात काहीच पडलं नाही. अजित दादा…!तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर देखील बदल होईल असं वाटलं होतं.पण व्यवस्थेची गंगा सगळी उलटी वाहू लागली आहे. उलट शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढतो आहे. आता हेच पहा ना! बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदीकाठीची गाव दहशती रात्रभर जागत राहिली. अनेक ठिकाणी नद्यांनी पात्र बदलले.शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या. कापसाच्या वाती, सोयाबीनची माती डोळ्या देखत झाली. शेतांना तलावाचं रूप आलं. पीक पाण्यामुळे दिसेनाशी झाली ‌जनावरांसह मालमत्तेची मोठी नुकसान झाली. सोयाबीनला कोंब फुटली. काढणीला आलेला उडीद मूग कापसेजला गेला. ती कुजूनही गेली.या सगळ्या घटना मंत्रालयातील एसी मध्ये बसून दादा आपण पाहत होता. प्रसार माध्यमं शेतकऱ्यांच दुःख, खरवडून गेलेल्या जमिनी, पाण्यात डुबकी मारलेली पिकं, शेतकऱ्यांनी केलेला आक्रोश जशाचा तसा दाखवत होती. सरकारकडे अत्याधुनिक सॅटॅलाइट यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यावरूनही परिस्थितीचा अंदाज घेण अवघड नव्हतं. अतिवृष्टीची सरकारी आकडेवारी, हवामानाचे अंदाज यासारख्या गोष्टी शासनाकडे उपलब्ध झाल्या. मात्र तरीही अतिवृष्टीतील पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमा खरवडण्याचं काम करण्याची गरज होती का? नुसतं सरकार पाठीशी आहे. काळजी करू नका! असं म्हणून नुसता कोरडा धीर देण्यापलीकडे शासनाने काय केलं? ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदतीची घोषणा करून नंतर तुम्ही शेतकऱ्यांकडे आला असता तर त्यांच्या भळभळत्या जखमेवर मलम तरी लागला असता. पण इच्छाशक्ती नसल्यावर प्रत्येक गोष्ट राजकारण्याच्या भूमिकेतून पाहण्याचा परिणाम शेतकऱ्यांना आपलं कोणीच वाली नाही. अशी भावना जोर धरू लागली आहे.
अजित दादा…! तुमचा अतिवृष्टी पाहणी दौरा जाहीर होताच स्वप्नांना मूठ माती मिळालेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मांजरा नदीला आलेल्या पुरात 8 एकर सुपीक जमीन खरवडून गेली म्हणून केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी रमेश गव्हाणे या 65 वर्षीय शेतकऱ्याने विद्युत ट्रांसफार्मर ला स्पर्श करून आत्महत्या केली. अंथरवन पिंपरी येथील शेतकरी चंद्रकांत रघुनाथराव कुटे वय 62 वर्ष या शेतकऱ्याने देखील अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे झालेलं कर्ज कसं फेडायचं. वर्षभर कुटुंबाचं पोट कस भरायचं? या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे भीमराव कुटे हा लढवय्या शेतकरी पुत्र शेतकरी चळवळी करत होता. आशा लढवय्या पुत्राला जन्म देणारा तो बाप होता.
अजित दादा…! पालकमंत्री म्हणून बीडच्या जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण शेतकऱ्यांच्या पदरात आतापर्यंत निराशाच पडली आहे. आणखी किती शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सरकार भाग पाडणार आहे? किती आत्महत्यांची आकडेवारी झाली म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणार आहात? ठोस मदतीची घोषणा कधी करणार आहात? की नुसतचं अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जुन्याच निकषानुसार दमडी देऊनच शेतकऱ्यांना बोळवणार? दादांचा हा अतिवृष्टी पर्यटन दौरा तर ठरणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न बीडच्या जनतेला पडू लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles