बीड — गेल्या दोन पिढ्यांनी तिची आतुरतेने वाट पाहिली…! ती भेटावी अशी इच्छा प्रत्येकानेच बाळगली…! तिच्यासाठी संघर्ष ही उभा राहिला….! अनेकांनी भुलथापांची हाकाटी देत वेड्यातही काढलं..! पण तरीही तिच्यासाठी आसुसलेलं मन तिची वाटच पाहत राहिलं…! अखेर ती आज भेटली..! प्रत्येकाच्या डोळ्याच पारणं फिटलं…! मन आनंदाच्या हिंदोळ्यावर रममान झालं…! आज तिचा मनसोक्त आनंद ही उपभोगता आला…! ती रेल्वे…! आज बीड करांनी प्रत्यक्षात अनुभवली…!
जिल्ह्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणारा क्षण आज बीडच्या नव्याने उभारलेल्या रेल्वे स्थानकावर पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) , खासदार बजरंग सोनवणे, तसेच बीड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बीड-अहिल्यानगर (Beed-Ahilyanagar Railway) रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यादरम्यान नेत्यांनी व्यासपीठावरून बीडच्या रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. हिरवा झेंडा दाखवत पहिल्या रेल्वेगाडीला रवाना करण्यात आली.
167 किमी अंतरावर पहिली रेल्वेगाडी धावली
पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगर या 167 किमीच्या मार्गावर डेमू रेल्वे सेवा सुरु झाली आहे. संपूर्ण मार्ग बीड-अहिल्यानगर-परळी (एकूण लांबी 261 किमी) असला तरी, आजपासून प्रवाशांसाठी केवळ बीड ते अहिल्यानगर हा टप्पा खुला करण्यात आला आहे.
या प्रवासासाठी 10 ते 40 रुपये इतका तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे. बीड ते राजुरी नवगण स्थानकाचे तिकीट केवळ 10 रुपये तर बीड ते अहिल्यानगर प्रवासाचे तिकीट 40 रुपये इतके आहे.

अनेकांनी राजुरी पर्यंत केला प्रवास
बीड मधून अहिल्या नगर कडे आज पहिल्यांदा रवाना झालेल्या रेल्वेचा अनुभव अनेकांनी घेतला. रेल्वेचा आनंद लुटण्यासाठी अनेकांनी नवगण राजुरी पर्यंतचा प्रवास केला. तिथल्या स्थानकावर उतरून पुन्हा नेहमीच्या सवयीप्रमाणे टमटम मध्ये बसून बीड पर्यंतचा प्रवास केल्याच चित्र पाहायला मिळालं

