मुंबई — संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रान उठवले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील या प्रकरणात आरोपी आहे.या मु्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
https://x.com/anjali_damania/status/1886119078643060795
राज्यातील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर याआधी टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तर, मुंडे यांनी आपला राजीनामा मागण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे स्पष्ट केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कराड आणि मु्ंडे यांचे व्यावसायिक संबंधाची कागदपत्रे दमानिया यांनी सादर केली. मात्र, त्यानंतरही मुंडे यांचा राजीनामा मान्य झाला नााही. या पार्श्वभूमी अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केले आहे.अंजली दमानिया यांनी म्हटले की, ‘हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल. मंगळवारी सकाळी 11 वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. या पुराव्यांवर आपण मागील 4 दिवस काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.’
धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही- अंजली दमानिया
नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे…धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.