बीड –संतोष देशमुख हत्या प्रकरणात एस आय टी, सीआयडी नंतर आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात घोषणा केली होती.सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलीयानी ही चौकशी करणार आहेत.एम एल ताहलियानी यांनी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केल्याची माहिती आहे.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती मात्र या संदर्भात कुठलेही आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत होते.अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार असून समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झाडाझडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीकडून आपला अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.