बीड — महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी गट क संवर्गानुसार पद नामात बदल करण्यात आला असून यापुढे तलाठी हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळखला जाणार आहे. तर कोतवालांना यापुढे महसूल सेवक म्हणून ओळखले जाणार आहे. या संदर्भातील शासनादेश 14 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या विविध कलमानुसार अनेक जबाबदाऱ्या तलाठ्यांना पार पाडाव्या लागतात. महसूल विभाग व शेती यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून तलाठी ओळखला जातो. मात्र महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने केलेल्या मागणीनुसार तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी अशी नवी ओळख या पदाला मिळणार आहे. अटींच्या अधीन राहून या नव्या पदनामाला मान्यता देण्यात आली आहे. पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारी कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी/वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नाही व ती विचारात घेतली जाणार नाही. सातव्या वेतन आयोगानुसार तलाठी पदाचीच वेतनश्रेणी लागू राहणार आहे. तिच्यात बदल करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नाही. तसेच तलाठी पदाच्या गट क संवर्गात कोणताही बदल होणार नाही. अशा अटी घालून पदनामात बदल करण्यात आला आहे.
याबरोबरच ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या कोतवाल पदाचे पदनाम महसूल सेवक करण्यात आले आहे. तीन जुलै 2024 रोजी कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करणे व इतर मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीतील निर्देशानुसार अप्पर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची 29 ऑगस्ट 2024 रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतील शिफारशीनुसार महसूल सेवक म्हणून नवी ओळख कोतवालांना मिळणार आहे. मात्र या पदनाम बदलामुळे भविष्यात शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची कोणतीही मागणी विचारात घेतली जाणार नाही. कोतवाला मानधनामध्ये तसेच सेवा विषयक बाबी मध्ये कोणताही बदल अथवा मागणी विचारात घेतली जाणार नसल्याचे 14 ऑक्टोबर रोजी शासनाने काढलेल्या शासनादेशात म्हटले आहे.