बीड — महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटींच्या अपहारप्रकरणात ४१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील मुख्य आरोपी असलेल्या सत्यभामा बांगर यांना आज सकाळी राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी ही अटक केल्याची माहिती असून आज श्रीमती बांगरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून मल्टीस्टेट आणि सहकार क्षेत्रातील भोंगळ कारभार उजेडात येत आहे. महात्मा फुले बँकेसह चौदा सहकारी संस्था मध्ये चौदा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे दोन दिवसापूर्वी उघडं झाले होते. बांगर यांच्यासह ४१ लोकांवर गुन्हे दाखल झाले असून सत्यभामा बांगर यांना यात अटक झाली आहे.रामकृष्ण बांगर, सत्यभामा बांगर, बाळा बांगर यांनी महात्मा फुले अर्बन बँक, डेअरी, शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. मागील तीस चाळीस वर्षेपासून बांगर यांचे साम्राज्य अबधित होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने बांगर यांनी करोडो रुपयांचा अपहार केला. मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. अखेर हा सर्व गैरभार उजेडात आल्यानंतर बांगर कुटुंबीय फरार झाले होते. सत्यभामा बांगर तुळजापूरला दर्शन घेऊन रात्री मध्यरात्री घरी आल्या होत्या. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आज सकाळी सपोनि बाळराजे दराडे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या सत्यभामा बांगर यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी घेऊन जाण्यात येत असून त्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.