केज — पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून धारूर तालुक्यातील एका शिक्षकांने गळफास घेऊन एक वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या पश्चात दोन मुले व वृद्ध आई असताना खोट्या कागदपत्र आधारे मृत शिक्षकाच्या पत्नीने पतीच्या आईला अंधारात ठेवत वारस प्रमाणपत्र काढले. याला मृत शिक्षकाच्या आईने न्यायालयात आव्हान दिल्यानंतर वारस प्रमाणपत्र स्थगित ठेवण्याचा आदेश देत चपराक दिली आहे.
धारूर तालुक्यातील एका गावातील चंद्रकांत सुरवसे हे जि. प. शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्यांनी पत्नीच्या अनैतिक संबंधाला व
पत्नीच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून 5 एप्रिल 2023 ला गळफास घेवून आत्महत्या केली.
त्यानंतर मयत शिक्षकाच्या पत्नीने 19 एप्रिल 2023 रोजी धारूर न्यायालयात वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करून 27 जून 2023 रोजी ती स्वतः व त्यांची दोन मुले ही वारस असल्याचे वारस प्रमाणपत्र क स्तर दिवाणी न्यायालय धारूर येथून प्राप्त केले होते. वास्तविक मयत शिक्षकाच्या पश्चात त्यांची आईदेखील वारस आहे. मात्र मयताच्या आईचा उल्लेख वारस प्रमाण पत्र मिळविताना त्या शिक्षिकेने केला नव्हता. त्या वारस प्रमाणपत्रा विरोधात मयत शिक्षकाच्या वृद्ध आईने 26 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला धारूर न्यायालयाने सदर मयत शिक्षकाला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असतानाही मयताच्या पत्नीने त्याच्या आईला आणि न्यायालयाला अंधारात ठेवून व खोटे पुरावे आणि दस्ताऐवज सादर करून मिळविलेल्या वारस प्रमाणपत्राला 5 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे मूळ अर्जाचा निकाल लागेपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.