बीडमध्ये कर्ज आणि नापिकीच्या चिंतेतून ६५ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

Spread the love

बीड शेतकरी आत्महत्या प्रकरणाने देवीबाभूळगावात हळहळ व्यक्त होत आहे.

चौसाळा — गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने हिरावलेले पीक, यंदाच्या खरिपात झालेला खर्चही निघाला नाही आणि पावसाअभावी रब्बीची पेरणीही रखडली. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह, शेतीसाठी घेतलेली उसनवारी आणि जनावरांचा सांभाळ कसा करायचा, या विवंचनेतून बीड तालुक्यातील देवीबाभूळगाव येथील ६५ वर्षीय शेतकरी जीवन निवृत्ती जोगदंड यांनी आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बीड कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या

जीवन जोगदंड यांनी यंदाच्या खरीप हंगामात उसनवारी करून पेरणी केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकांचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतीसाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. दुसरीकडे, रब्बी हंगामासाठी आवश्यक पाऊस न झाल्याने पेरणी करता आली नाही. सलग दोन हंगामांत शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते.

बीड शेतकरी आत्महत्या: गावात शोककळा

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले होते. त्यानंतर यंदाच्या हंगामातही निराशा पदरी पडली. शेतीसाठी घेतलेले उसने पैसे कसे फेडायचे, पुढील वर्षभर कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा आणि जनावरांचा सांभाळ कसा करायचा, अशा अनेक चिंता त्यांना सतावत होत्या. याच विवंचनेतून त्यांनी शनिवारी (दि. २२ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले.

ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवीबाभूळगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सलग दोन हंगामांतील शेतीचे नुकसान आणि आर्थिक विवंचनेने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याने देवीबाभूळगावसह परिसरातील गावांतून हळहळ व्यक्त होत आहे.

बीड शेतकरी आत्महत्या या घटनेनंतर देवीबाभूळगावात शोककळा पसरली आहे. सलग दोन हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

या प्रकरणात प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून, शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

📰 हे देखील वाचा

👉 बीड जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई –
येथे क्लिक करून वाचा

🌾 शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनांची संपूर्ण माहिती –
अधिकृत वेबसाईटवर पहा

💛 मदत घ्या, बोला: मानसिक तणावात असाल तर एकटे राहू नका. आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा 9152987821 या हेल्पलाईनवर संपर्क करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *