उद्याच कोरड्या दुष्काळाचा जीआर; फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

वाशिम —  राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) उद्याच काढण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी गुरुवारी (२४ सप्टेंबर) वाशिम जिल्ह्यात केली. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासह कर्जवसुलीला स्थगिती देण्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील म्हसला, मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण आणि मालेगाव तालुक्यातील जऊळका या गावांना भेटी दिल्या. शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

उद्याच कोरड्या दुष्काळाचा जीआर

“उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. सगळ्यांना पूर्णपणे मदत करणार आहोत. २०१६-१७ मध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार आहोत. विम्याचे प्रश्नही सोडवणार आहोत,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नव्हे, तर थेट आर्थिक मदतीची गरज असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणासाठी मदत तसेच अन्नधान्याच्या गरजांसाठी आवश्यक मदत करण्याचे त्यांनी सांगितले.

बँकांना कर्जवसुली थांबवण्याच्या सूचना

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांवर कर्जाच्या वसुलीचा ताण येऊ नये, यासाठी बँकांना वसुली करू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कर्जाच्या वसुलीला पूर्णपणे स्थगिती देण्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी आवश्यक मदत दिली जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

पीक विम्याचे पैसे मिळवून देणार

दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी सरकार हस्तक्षेप करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, वाशिम दौऱ्यात शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्यासह विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुष्काळी मदतीसंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांच्या प्रमुख घोषणा

  • उद्याच कोरड्या दुष्काळाचा शासन निर्णय (GR)
  • २०१६-१७ मध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी
  • शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत
  • कर्जाच्या वसुलीला स्थगिती
  • पीक विम्याची पूर्ण रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन
  • उपलब्ध पाण्यानुसार रब्बी पिकांसाठी मदत
  • पिण्याचे पाणी, चारा, शिक्षण आणि अन्नधान्यासाठी मदतीचे आश्वासन

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles