Home शिक्षण केज:शाळेचे छत कोसळले; 18 विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला

केज:शाळेचे छत कोसळले; 18 विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला

0
7

केज — केज तालुक्यातील तरनळी येथील तांदळे वस्तीवरील षटकोनी आकाराची शाळेची इमारत पावसामुळे रात्री अचानक कोसळली. सुदैवाने हा प्रकार मध्यरात्री शाळा बंद असताना घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, याच धोकादायक इमारतीत तब्बल 18 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. 18 सप्टेंबरच्या रात्री झालेल्या हलक्या पावसानंतर तांदळे वस्तीवरील लव्हुरी केंद्रातील घटक शाळेची षटकोनी इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. इमारतीचे छत आणि अन्य भाग जमीनदोस्त झाले आहेत.

या शाळेच्या इमारतीची अवस्था यापूर्वीपासूनच खराब होती. अगदी हलक्या किंवा रिमझिम पावसातही छतातून पाणी ठिबकत होते. इमारत धोकादायक असल्याची माहिती ग्रामस्थांनी शिक्षण विभाग, पंचायत समिती तसेच महसूल विभागाला दिली होती, अशी माहिती तांदळे वस्तीवरील रहिवासी चांगदेव सानप यांनी दिली.

दहा वर्षांपासून तक्रारी; तरीही दुर्लक्ष

“गेल्या दहा वर्षांपासून या धोकादायक इमारतीची माहिती प्रशासनाला देत आहोत; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही इमारतीबाबत वेळीच ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी सांगितले की, “वस्ती शाळेच्या इमारतीचे छत पावसाने गळत असून पाणी ठिबकत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्याची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली होती.”

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

शाळेची इमारत कोसळल्यानंतर पालक आणि ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. धोकादायक इमारतीची पूर्वकल्पना असतानाही विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी शिक्षण घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच इमारतीच्या बांधकामातील जबाबदारी निश्चित करून संबंधित गुत्तेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, तांदळे वस्तीवर जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कोसळलेल्या शाळेच्या इमारतीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था आणि रस्त्याच्या प्रश्नावरही तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here