भरधाव ट्रकच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

बीड — बीड ते नवगण राजुरी मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातामुळे नवगण राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात कैलास टूले, अक्षय शिंदे आणि ऋषिकेश फुलझळके यांचा मृत्यू झाला. तिघेही दुचाकीवरून आपल्या गावी परतत असताना बीड-नवगण राजुरी मार्गावरील उकंडा फाट्याजवळ हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र दुचाकीवरून प्रवास करत असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नवगण राजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुलाच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव?

दरम्यान, अपघातस्थळी सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक आणि रेडियमची व्यवस्था नसल्याने अपघात घडला, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या अपघाताला नेमकी कोणती कारणे कारणीभूत ठरली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles