Home राज्य एक हजार कोटींचा आरोप अन् ईडीची चौकशी; जरांगे गटासमोर आता नवे संकट

एक हजार कोटींचा आरोप अन् ईडीची चौकशी; जरांगे गटासमोर आता नवे संकट

0
7

बीड —  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांविरोधात मराठा आंदोलक अजय बारसकर यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) तक्रार केली आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून अवैध संपत्ती जमवल्याचा गंभीर आरोप बारसकर यांनी केला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने ईडी कार्यालयाने बारसकर यांना बोलावून माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपलब्ध पुरावे अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगितले.

ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पांडुरंग तारक, किशोर गलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरुंदकर, संजय कटारे, स्वप्निल तारक, बद्रिनाथ तारक आणि विलास खेडकर यांच्यासह अन्य व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

‘किमान एक हजार कोटींचा भ्रष्टाचार’

बारसकर यांनी आरोप केला की, संबंधितांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, या प्रकरणात किमान एक हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची आमची भूमिका आहे. संबंधितांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

डिफेंडर गाड्या कुठून आल्या, लिलावती हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च कुठून करण्यात आला, पांडुरंग तारक यांनी ५० एकर जमीन कशी खरेदी केली, यासह इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही बारसकर यांनी केली.

वाळू धंद्याचीही चौकशी करा

जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित असल्याचा आरोप केलेल्या वाळू व्यवसायाचीही चौकशी करण्याची मागणी बारसकर यांनी केली. या प्रकरणात उपलब्ध पुरावे ईडी अधिकाऱ्यांकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.

दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या; काळकुटेंचे प्रत्युत्तर

दरम्यान, अजय बारसकर यांच्या आरोपांवर गंगाधर काळकुटे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले. आमची नावे ज्यांना घ्यायची असतील त्यांनी घ्यावीत; चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, असे काळकुटे म्हणाले.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले तर आम्ही चौकशीला जाण्यास तयार आहोत. ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे सांगत त्यांनी ईडी, सीबीआय किंवा अन्य कोणत्याही तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची तयारी दर्शवली.

मी वाळूचा किंवा कोणताही बेकायदेशीर व्यवसाय करत असेल तर माझ्यावर कारवाई करावी. आमची कोणतीही चौकशी करा, असे आव्हानही काळकुटे यांनी दिले. बारसकर यांनी केलेल्या आरोपांमधील पुरावे समोर आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

अशा प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधातील तक्रारीनंतर आता ईडीकडून पुढे काय कारवाई होते, याकडे राजकीय आणि मराठा आंदोलनाच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here