केज — केज-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जवळबन येथील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास चंदनसावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात घडला. या घटनेमुळे जवळबन गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज येथून तिघेजण कारमधून जवळबनच्या दिशेने जात होते. चंदनसावरगाव शिवारातील पुलाजवळ कार भरधाव वेगात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जाऊन आदळली.
धडक एवढी जोरदार होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील तिघेही वाहनात अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने तिघांना कारमधून बाहेर काढून तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५) आणि प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८), दोघेही रा. जवळबन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या अपघातात दत्ता तपसे (वय ४३, रा. चंदनसावरगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




