बीड — शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रविवारी (दि.९) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी दोनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या. पक्षाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवणारा ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विशेष लक्ष असणार आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पक्षाच्या मुलाखत मंडळात जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, राज्य प्रवक्ते भागवत तावरे, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, अशोक हिंगे, फारूक पटेल यांचा समावेश होता. या मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत नगरसेवक पदासाठी दीडशेहून अधिक तर नगराध्यक्ष पदासाठी १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रज्ञा खोसरे, तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत, कार्यालय चिटणीस महादेव धांडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती
नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी ३५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले होते. त्यापैकी १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये प्रणिती राजेंद्र पवार, सारिका विकास जोगदंड, पूजा भीमराव वाघचौरे, मीना भिमराव वाघचौरे, पूजा गणेश वाघमारे, क्रांती बाबुराव वडमारे, वंदना शरद साळवे, मीना अशोक वाघमारे, क्रांती प्रेम चांदणे, सविता मनोज मस्के, संगीता सुरेश वाघमारे, लता अविनाश शिरसट, छाया अशोक वीर, सुनिता उत्तम पवार, सुप्रिया माणिक वाघमारे, राधा चंद्रकांत थोरात यांचा समावेश आहे.
पक्ष कार्यालय परिसरात तोबा गर्दी
मित्रनगर चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरूच होत्या, ही प्रक्रिया संपवून जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण हे पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार होते.
माहोल बदलने वाला है! मुस्लिम उमेदवारांकडून जोरदार तयारी
बीड शहरात सुमारे ४० टक्के म्हणजेच तब्बल ६५ हजार मुस्लिम मतदार आहेत. आजवर या मतदारांना गृहीत धरून मते घेतली गेली; मात्र यापुढे तसे होणार नाही. अजितदादा पवार यांची भूमिका आणि विकासाचा मुद्दा लक्षात घेता मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहणार असल्याचे अनेक मुस्लिम बांधवांनी स्पष्ट केले.

