मुंबई — राज्यात कालपासून ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच कोकणातील सिंधूदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.उद्या संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि गडिचिरोली तसेच बीड, अहिल्यानगर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानसह हलक्या सरींची शक्यता आहे.

