पाटोदा — येथील तहसील कार्यालयातून चोरट्याने चक्क संगणक लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चक्क तहसील कार्यालयातूनच ही चोरी झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच शासकीय कार्यालयही आता चोरट्यांपासून सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याबाबत पुढे आलेल्या माहितीनुसार, पाटोदा तहसील कार्यालयातील महसूल विभागातून संगणकाची चोरी झाली आहे. तहसील प्रशासनाने चोरीचा प्रकार उघड होऊ नये यासाठी प्रयत्न केला. मात्र ही बाब नायब तहसीलदार गणेश दहिफळे यांच्या लक्षात येताच त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. यात चोरट्याने हा संगणक लंपास का केला? की कार्यालयातूनच याची चोरी झाली. याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र तहसील कार्यालयच असुरक्षित असल्याचा प्रत्यय या निमित्ताने समोर आला आहे.