शिरूर (का) –अज्ञात व्यक्तीस विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या सतीश भोसले ऊर्फ खोक्या याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसलेने तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बावी येथील एका व्यक्तीने गुरुवारी पोलिसात दिली आहे.दिल्यानंतर भोसलेवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील बावी येथील एका व्यक्तीला विवस्त्र करून मारहाण केली जात असल्याची चित्रफीत व्हायरल झाली होता. या व्यक्तीच्या पायावर एका तुटलेल्या बॅटने जोरजोरात अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणात बुधवारी सतीश भोसलेसह चार जणांवर पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी दुसराही गुन्हा दाखल झाला आहे. बावी येथील फिर्यादी दिलीप ढाकणे (वय ५५) हे रानवस्ती येथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ते आपल्या जांभळीच्या शेतामधे गेल्यानंतर झापेवाडी येथील भाऊसाहेब भोसले याने हरिण पकडण्याकरीता जाळे लावल्याचे त्यांना समजले. जाळे काढून घेण्यास सांगताच भोसलेने साथीदारांना बोलावून मारहाण केली.
आरडाओरड ऐकून दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश त्याठिकाणी आल्यानंतर ते पळाले. फोन करून त्यांनी सतीश भोसले आणि साथीदारांना बोलून घेऊन दोघांना मारहाण केली. त्यामध्ये दिलीप यांचे दात पडले तर महेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, सतीश भोसले हा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

