माझगाव — दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाने 15 लाख रुपयांची लाच स्वीकारली. याशिवाय लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना काॅल करून रक्कम स्वीकारू का विचारलं, त्यावर न्यायाधीशांनी देखील संमती दिली.यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव याला 15 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या बाजूनं निकाल लावण्यासाठी क्लार्कने 25 लाखांची मागणी केली होती. त्यानं पैसे घेताच फोन लावला आणि न्यायाधीशांनीही ते घेण्यासाठी संमती दिली. आता या प्रकरणी न्यायाधीशांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची जागा बळजबरीने ताब्यात घेतल्याचा वाद गेल्या 10 वर्षांपासून न्यायालयात चालू आहे. याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे पण केस दिवाणी सत्र न्यायालयात वर्ग केली होती. 9 सप्टेंबरला कोर्टात गेल्यावर लिपिकानं तक्रारदाराशी संपर्क साधला. यानंतर निकाल बाजूने लावण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली.
न्यायाधीशांच्या माध्यमातून निकाल तुमच्या बाजूने लावतो म्हणून २५ लाख मागितले. यातले १० लाख मला आणि १५ लाख न्यायाधीशांना द्यावे लागतील असं सांगितलं. यानंतर सतत कॉल करून पैशांची मागणी केली. पण इतके पैसे देणं शक्य नसल्यानं तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार केली.
लिपिक वासुदेव यानं शेवटी 25 ऐवजी 15 लाखांवर तडजोड केली. यासाठी सापळा रचून 11 नोव्हेंबरला त्याला अटक केली. अटकेनंतर वासुदेवनं न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करत लाचेची रक्कम स्वीकारल्याचं सांगितलं. न्यायाधीशांनी संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेवसह काझींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी न्यायाधीशांच्या अटकेसह घराची झडती घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे

