Wednesday, February 11, 2026

सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, भरारी पथकांच्या माध्यमातून 10वी12वी परीक्षा होणार!

गैरप्रकार करणारांवर अजामीन पात्र गुन्हे दाखल करणार — जॉन्सन

बीड — जिल्ह्यात फेब्रुवारी–मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भात संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले असून, परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
परीक्षांचा पारदर्शकपणा राखणे, विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर येणे आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणे, या उद्देशाने हे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर आवाज रेकॉर्डिंगसह सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कंट्रोल रूमच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवरील चित्रणावर थेट नजर ठेवण्यात येणार आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार असून, परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षांच्या दिवशी भरारी पथक व बैठे पथक सक्रिय राहणार असून, परीक्षा केंद्र परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा स्तरीय दक्षता समिती गठीत

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन अध्यक्ष, पोलीस अधिक्षक नवीनीत कॉवत सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जितिन रहेमान सदस्य, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सदस्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी सदस्य योजना शिक्षणाधिकारी सदस्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव आहेत. दरम्यान कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असे मत व्यक्त करत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पालक, शिक्षक, अधिकारी व नागरिकांनी या अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles