बीड — शहरातील नव्या मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची वानवा, पत्र्याच्या शेडमधील बंद शौचालये, बंद अवस्थेतील पथदिवे आणि पावसाळ्यात छताला होणारी गळती या कारणांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांनी थेट पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार देत आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबविण्यात येत आहे. बीड विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक येथील मुल्यांकन समिती हे सर्व्हेक्षण करणार आहे.
या पार्श्वभूमीवर, एरव्ही झोपी गेलेले बीड आगार प्रशासन आता जागे झाले असून स्थानक परिसराची धूळ झटकण्यासाठी स्वच्छतेच्या कामाला लागले आहे. स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई, परिसरातील गवत काढणे आणि पथदिव्यांची दुरुस्ती अशी कामे गतीने सुरू आहेत.
विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व्हेक्षण समितीला सादर करण्यासाठी मास्टर कंट्रोल चार्ट, नोंदवही, बसस्थानक भेट नोंदवही आणि इतर संबंधित कागदपत्रांची तयारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

