मुंबई — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काळजीत भर घालणारी बाब समोर आली आहे ‘ला निना’चा प्रभाव ओसरू लागला असून आता पुन्हा एकदा ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ च्या ताज्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये एल निनो पुन्हा डोकं वर काढणार असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याची पातळी तापू लागली असून एल निनोची लक्षणे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांच्या मते
सक्रियता — २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रभाव अधिक तीव्र होईल.
कालावधी — जून ते सप्टेंबर दरम्यान, जेव्हा भारताला पावसाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच एल निनो शिखरावर असेल.
परिणाम — यामुळे केवळ भारतच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.भारतातील शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. स्कायमेटच्या मते, एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्येही एल निनोमुळे पावसाने ओढ दिली होती, ज्याचा मोठा फटका खरिपाच्या पिकांना बसला होता.सध्या ‘ला निना’मुळे हवामान काहीसे अनुकूल असले तरी, वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे चित्र बदलणार आहे. उन्हाळ्यात हवामान ‘तटस्थ’ स्थितीत जाईल आणि त्यानंतर होणाऱ्या ‘पॅसिफिक फ्लिप’ मुळे एल निनोची एन्ट्री होईल. हा बदल जागतिक हवामान पद्धतीत मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो.२०२३-२४ मध्ये एल निनोचा प्रभाव ११ महिने टिकला होता, ज्यामुळे ते वर्ष विक्रमी उष्ण ठरले. त्याचा थेट परिणाम तांदूळ, डाळी आणि साखरेच्या उत्पादनावर झाला होता. जर २०२६ मध्येही हीच परिस्थिती राहिली, तर शेती उत्पादनात घट होऊन पुन्हा एकदा अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

