Sunday, December 14, 2025

शेतकरी आत्महत्यांची दखल न्यायालय घेत नाही, पण शेतकरी रस्त्यावर उतरलेला जमत नाही — बच्चू कडू

न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकरी आंदोलनावर ठाम

नागपूर — शेतकरी आंदोलनाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे.. पोलिसांनी न्यायालयाचे आदेश घेऊन आंदोलनस्थळी धाव घेतली, पण आंदोलकांचा विरोध पाहता त्यांना आदेशासह परत जावे लागले.यावेळी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

त्यांनी सांगितले की, “आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, रस्ते मोकळे करतो, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा न्यायालय सरकारला आदेश देत नाही, पण शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरले तर तात्काळ आदेश दिले जातात. या दुहेरी निकषाबद्दल त्यांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही होते. नागपूर-वर्धा मार्गावरील पांजरा येथील कापूस संशोधन केंद्राजवळ शेकडो आंदोलक काल रात्रीभर मुक्काम ठोकत आणि आज ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे आज दिवसभर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.

आज सकाळी काही आंदोलक रेल्वे रुळांवर उतरले आणि रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर टायर जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, राज्य सरकारने राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पकंज भोयर हे आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. काही आंदोलकांनी आसपासच्या शेतात, मोकळ्या जागेत तसेच एनएचएआयतर्फे विकसित केलेल्या ऑक्सीजन-बर्ड पार्कमध्ये प्रवेश करून तेथे ठिय्या दिला आहे. काही शेतकरी विश्रांती घेत असताना, इतरांनी मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण मिळाले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन छेडले. त्यामुळे दिवसभर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles