मुंबई — राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी 5 डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या 21,477 आणि माध्यमिक शाळेतील 2539 शाळेतील एकूण 96 हजार 800 शिक्षक शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाची वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक आणि शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावरून केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने काढलेला 15 मार्च 2024 चा सरकारचा निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता केली जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक, मुख्याध्यापक आधी संघटनांकडून 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.यामध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर आदी विभागाचा अपवाद वगळता राज्यातील अर्ध्याहून अधिक शाळांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे विविध संघटनांमधील मतभेद समोर आले तर दुसरीकडे संस्थाचालकांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे राज्यभरात अनुदानितच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्याचे चित्रही विभागाच्या अहवालात दिसून आले आहे.
राज्यभरात 5 डिसेंबर रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात किती शिक्षक सहभागी झाले आणि किती शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या, या संदर्भातील अहवाल तयार केला असून यात माध्यमिकच्या 26,490 शाळांपैकी केवळ 2,539 शाळा बंद राहिल्या, तर या शाळांमध्ये कार्यरत असलेले 2 लाख २४ हजार 366 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ 13, 216 शिक्षकांनी शाळा बंद मध्ये सहभाग घेतल्याने राज्यातील माध्यमिकच्या शाळा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू होत्या, असे चित्र विभागाच्या अहवालातून दिसून आले आहे.
शाळा बंदचा सर्वाधिक फटका प्राथमिकला
शाळा बंदचा सर्वात मोठा प्रभाव प्राथमिकच्या अनुदानित शाळांमध्ये दिसून आला. राज्यात असलेल्या 57 हजार 13 शाळांपैकी 21 हजार 477 शाळा पूर्णपणे बंद राहिल्या. तर उर्वरित तब्बल 35 हजार 536 शाळा सुरू होत्या. शाळा बंद असलेल्या शाळातील 83 हजार 584 शिक्षक आपल्या शाळांवर गैरहजर राहून शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले होते.
प्राथमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये सर्वाधिक 2925 शिक्षक नाशिक जिल्ह्यात, तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यात 2348 इतके गैरहजर राहिले. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात आचारसंहितेमुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यामुळे या जिल्ह्याला शाळा बंदचा कोणताही फटका पडला नाही. तर त्यासोबतच यवतमाळ बुलढाणा, नागपूर, मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या परिसरामध्ये प्राथमिकच्या सर्व शाळा सुरू होत्या.
माध्यमिकच्या सर्वाधिक शाळा कोल्हापूर विभागात 848 शाळा बंद राहिल्या. यामध्ये एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 469 शाळा बंद होत्या, तर सर्वात कमी शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकही शाळा बंद नव्हती सर्व शाळा सुरळीत सुरू होत्या. राज्यातील बृहन्मुंबई पश्चिम, ठाणे, पालघर, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी धाराशिव,
अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात एकूण सर्वच माध्यमिक शाळा सुरू होत्या. या जिल्ह्यांमध्ये शाळा बंदचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही.

