Sunday, February 1, 2026

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा;निवडणूक आयोगानं ‘पिपाणी’ चिन्ह वगळलं

मुंबई — लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या “पिपाणी”(ट्रंपेट) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. दरम्यान शरद पवार यांनी या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे. या निवडणुकी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत राजकीय पक्षांसह मान्यता असलेल्या चिन्हांची यादी जारी केली आहे. त्यातून पिपाणी चिन्ह हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता. अपक्षांना दिलेल्या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. विधानसभा निवडणुकीतही पिपाणी आणि तुतारी चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाल्याने 9 ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं…! पण असो! देर आए दुरुस्त आए..!” असे रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं.

शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण अस याला म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles