बीड — संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे या प्रकरणात वाल्मिकने घेतलेल्या या निर्णयामागे नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही.
आज वाल्मिकने खंडणी प्रकरणात केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, वाल्मिकने जामीन अर्जच मागे घेतल्यामुळे ही सुनावणी होऊ शकलेली नाही.दरम्यान, वाल्मिक कराडची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली. यानंतर त्याला बीडमधील (Beed Jail) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कालच वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो आता बीड जेलमध्ये होता. जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वाल्मिकच्या पोटात दुखत असल्याची माहिती समोर आली. यानंतर काही वेळातच कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला तुरूंगातून थेट बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.प्रकृती नाजूक असल्यानं वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबद्दल रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.