बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी मोकाट आहे. हत्येच्या मास्टर माईंड ला वाचवलं जातंयं, एसआयटी असो की सीआयडी देशमुख कुटुंबीयांना माहिती देत नाही. वाल्मीक कराड वर 302 मोक्का लावण्यात यावा यासाठी टोकाची भूमिका घेत टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करावे लागतय, राज्यात हत्येनंतर संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आंदोलन झाली. एवढं होऊनही सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय पद्धतीने हत्या केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. लोकसभेत,विधानसभेत हत्येचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे तसेच तपास सीआयडी मार्फत करण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने कारवाई देखील केली. असं असताना देखील वाल्मीक कराडने समर्पण केल्यामुळे तो सीआयडीला सापडला मात्र पोलिसांना शरण न आलेला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. राज्यात ठीक ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन झाली. संतोष देशमुखांच्या लेकीने प्रत्येक ठिकाणी आक्रोशाचा टाहो फोडला. तीच स्थिती भाऊ असलेल्या धनंजय देशमुख यांची आहे. राज्यभर न्यायाची मागणी होत असली तरी या घटनेचा मास्टरमाइंड म्हणून आरोप असलेला वाल्मीक कराड उद्या जामिनावर बाहेर येईल व आपल्याला त्रास देईल कदाचित जीवावर उठेल अशी भीती मसाजोग ग्रामस्थांना वाटू लागली आहे. अजूनही दहशतीचा अंक संपायला तयार नाही. त्याला परिस्थिती ही तशीच कारणीभूत आहे. या प्रकरणातील प्यादे असलेले आठ आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले मात्र मास्टरमाइंड वाल्मीक कराड याला वाचवलं जात आहे अशी शंका म्हणण्यापेक्षा खात्रीच जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. वाल्मीक कराड वर फक्त आतापर्यंत खंडणीचाच गुन्हा दाखल आहे. वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द करून आपण खूप मोठी कारवाई केली असा आव जिल्हा प्रशासनाने आणला. इतकंच नाही तर पीडित देशमुख कुटुंबीयांना तपासा संदर्भात माहिती सुद्धा देण्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तपासात एवढी गुप्तता मास्टर माईंड ला वाचवण्यासाठी केली जात असल्याची जनभावना निर्माण होऊ लागली आहे. याच परिस्थितीला कंटाळून शेवटी आरोपी सुटलाच तर आपला जीव घेणार त्यापेक्षा आपणच आत्मदहनासारखा मार्ग स्वीकारलेला बरा अशी उद्विग्न भावना व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांचे मन वळवण्यात व त्यांना खाली उतरवण्यात यश मिळवले. एवढं आंदोलन पेटून लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च सभागृहात आवाज उठवून गाव समाज पाठीशी असताना देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल? न्यायासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल? तर गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील हा विचार न केलेलाच बरा. शेवटी हे राज्य न्यायाचे आहे की अन्याय करणाऱ्या गुंडांचे आहे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.