बीड — मादळमोहीच्या एका शिक्षकाने छत्रपती संभाजी नगरची संस्था विकत घेतली. एवढ्यावरच कारभार थांबला नाही तर तिथले विद्यार्थीही बीडच्या शाळेत आणल्याचा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाचा कारभार किती नंगा आहे हे समोर आल्याने खळबळ माजली आहे.
शिक्षकी देशातले काही शिक्षक ‘अजीम’ ओ शान शहेनशहा समजून नसते धंदे करत काळीमा फासण्याचा काम करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये देखील घडला आहे. मादळमोही येथे शिक्षक असलेल्या महाभागाने छत्रपती संभाजीनगर येथील एक शिक्षण संस्था खरेदी केली. ती नुसती खरेदीच केली नाही तर मुलांच्या भवितव्याशी खेळ मांडला. छ.संभाजीनगरच्या संस्थेत ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होता तेच विद्यार्थी बीडमध्ये संस्था आणल्यानंतर देखील शाळेच्या हजेरी पटावर आले गेले. वास्तविक पाहता संस्था विकत घेतल्यानंतर व तिचे स्थलांतर करताना त्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देणे आवश्यक होतं. छ.संभाजीनगर येथील एखाद्या शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं गरजेचं होतं. मात्र सध्या विद्यार्थी राहायला छत्रपती संभाजी नगर मध्ये आहेत. त्यांचे प्रवेश बीडच्या संस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ या शिक्षकाने मांडला आहे. एवढ्यावरच हे कृत्य थांबलं नाही तर बीडचे काही शिक्षक मोठी रक्कम घेऊन संस्थेत भरती केले. त्यांना दोन-तीन महिने अल्प प्रमाणात का होईना वेतनही देण्यात आले. मात्र भरमसाठ पैसा घेऊन देखील आता या संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या हातावर छदाम देखील या संस्थाचालक शिक्षकाने दिला नाही. परिणामी शिक्षकांच भवितव्य ही टांगणीला लागला आहे. उपासमार होत असली तरी बोलावं तर “बाबाही गेल्या अन् दशम्याही गेल्या” अशी वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर नोकरी ही जाईल तसेच संस्थाचालकाला दिलेला पैसाही पुढील अशा कात्रीत या स्थलांतरित संस्थेतील शिक्षकांची स्थिती झाली आहे. एवढा प्रताप मादळमोहीच्या शिक्षकाने करून देखील याची दखल शिक्षण विभागाने अजून घेतलीच नाही. घेणार की असाच या शिक्षकाचा नंगा नाच चालू राहणार? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं मातेर होणार? संस्थेत भरती झालेल्या शिक्षकांची स्वप्नदेखील धुळीला मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण विभागाने कमीत कमी छ.संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तरी विचार करून कारवाई करावी. त्या संस्थाचालक शिक्षकाला देखील आळा मोळा घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.

