उन्हाळा व रमजानच्या पार्श्वभुमीवर पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा
बीड — राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी बीडचा पाणीप्रश्न सोडवण्याचा शब्द दिला होता, सर्व यंत्रणांना कामाला लावत बीड नगर पालिकेच्या थकीत विज बिलासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. पाणी प्रश्नासह दादांचा बीडच्या विकासाचा वादा राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी आ. विजयसिंह पंडित थेट फिल्डवर उतरले आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव येथील बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता तुषार टेकावडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, सभापती शेख निजाम, संपादक शेख मुजीब यांची उपस्थिती होती.
शुक्रवार, दि.६ फेब्रुवारी रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत योजनेच्या पाईपलाईनवर पाणी गळती, पाणी वितरणातील अवमेळ, फिल्डवरील बिघाड याकडे झालेले दुर्लक्ष आणि तांत्रिक चुका अशा धक्कादायक बाबी यावेळी समोर आल्या. या सर्वांचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. माजलगावच्या काडीवडगाव येथील बॅकवॉटरवरून ३६ एमएलटी पाणी प्रत्यक्षात उचलण्यात येत असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे ईटच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. ही अशीच गळती जलशुध्दीकरण केंद्रावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याने याचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसताच आ. विजयसिंह पंडित यांनी भविष्यातील उन्हाळी परिस्थिती, रजमान व इतर सण लक्षात घेता तातडीने उपलब्ध साधन सामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्या बाबतच्या सूचना पालिका प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.
यावेळी पाणीपुरवठा अभियंता माने, विद्युत विभागाचे विजय गाडेकर, उदय ईपिल्ला, एम.जी. पठाण, दत्ता व्यवहारे, एम.बी.सानप, रशिद सय्यद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार
शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक शहरातील नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ॲक्टिव असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते, नाली, स्वच्छता, पाणी प्रश्न, विद्युत पुरवठा आदी मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आ. विजयसिंह पंडित यांच्यासह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवक उपलब्ध होत असून बीड नगर परिषदेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच शहरवासियांचे मुलभूत प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शहरात बदल होतोय
बीड नगर परिषदमध्ये स्व.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बीड शहरातील जनतेने परिवर्तन केले. नगर परिषदेची सत्ता हाती आल्यानंतर आ. विजयसिंह पंडित हे आपल्या नगरसेवकांसह शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रश्न निकाली निघत आहेत. स्वच्छतेसाठी घंटागाड्या, पाणी पुरवठा यांसह विविध मुलभूत प्रश्न मार्गी लागत असल्याने बीड शहरामध्ये बदल होत असल्याची चर्चा नागरीकांमधून केली जात आहे.

