बीड — जिल्हा रुग्णालयात एका 24 वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर तासाभरात रक्तस्रावाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या प्रकरणामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील अंबिल वडगाव येथील छाया गणेश पांचाळ वय 24 वर्ष ही महिला प्रसूतीसाठी शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची नॉर्मल प्रसूती होऊन तिने एका मुलाला जन्म दिला.प्रकृतीमुळे नवजात मुलास एसएनसीयू (काचामध्ये) ठेवण्यात आले. प्रसूतीनंतर तासाभरातच महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला. अति रक्तस्त्रावामुळे पहाटे छाया पांचाळ यांचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर बाळ सुखरूप आहे, परंतु छाया यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणी चौकशीसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचा अहवाल येताच पुढील कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी सांगितले आहे.