
बीड — गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलीस दलाला यश आले असून, या प्रकरणी एका आरोपीला जेरबंद करुन त्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर त्यांने चोरीची कबुली दिली आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. पाचेगाव (ता. गेवराई) शिवारातील एका वस्तीवरील बोराडे फार्म हाऊसवर चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आदी ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना काल शनिवारी (दि.११) स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त खबऱ्या मार्फत पाचेगाव चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा गेवराई येथे जातेगाव फाट्यावर उभा असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरलेली दागिने जप्त करण्यात आली आहेत. त्याकडे चौकशी केली असता आरोपीने पाचेगाव येथून वस्तीवर चोरी केल्याचे कबूल केले. एक आरोपी निष्पन्न झाला असून इतरांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, दिपक खांडेकर, आश्पाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांनी केली आहे.

