मावेजा दोनदा लाटला; नामदेव टिळेकर श्रीनिवास मुळे, निलेश बागडेंना वाचवण्याचे प्रयत्न
बीड — तालुक्यातील तिप्पटवाडी येथील गाव तलाव क्र–1 मधील जमीन संपादनाच्या एकाच प्रकरणात नियमबाह्य मावेजा वाटप करत दुहेरी लाभ देण्याचा प्रताप उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी केला. या प्रकरणात अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी टिळेकरांना साथ दिली. या भ्रष्टाचार प्रकरणात समिती गठीत करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तीन महिने होत आले तरी उपजिल्हाधिकारी धुमाळ आयुक्तांचा आदेश पादळी तुडवत त्रिमूर्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिप्पटवाडी येथे गाव तलाव क्रमांक -1 साठी जमीन संपादित करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधितांना भूसंपादन कायदा 1894 नुसार दिनांक 30 जानेवारी 2014 रोजी निधी वाटप केला होता. त्यानंतर भूसंपादन कायदा 2013 लागू झाला त्यामध्ये कलम 23 व 30 नुसार भूसंपादन कायदा 1894 नुसार वाटप केलेली रक्कम वजा करत 2013 च्या नवीन कायद्यानुसार निवडा केला अन् निधी मागणीसाठी उपजिल्हाधिकारी(रोहयो) यांचेमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने या अगोदर भूसंपादन कायदा 1894 नुसार निधी वितरित केला असल्याने 2013 नवीन कायद्यामध्ये सदर प्रकरण बसत नाही त्यामुळे निधी मागणी प्रस्ताव नाकारण्यात आला.
शासनाने निधी मागणी प्रस्ताव फेटाळल्यानंतर या प्रकरणी कार्यकारी अभियंता, ल.पा.जि.प. बीड यांच्याकडे निधी मागणी सादर करून शासनाची फसवणूक कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी केली अन् निधी मंजूर करून आणला त्यानंतर उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी संगनमताने रक्कम रु.4925058/-चा निधी नियमबाह्य वितरित केला. या मावेजा वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून तीन महिन्यात सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश सह–आयुक्त (पुनर्वसन) छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत.
उपजिल्हाधिकारी धुमाळ, यांच्याकडून विभागीय आयुक्ताच्या पत्राला केराची टोपली
विभागीय आयुक्तांनी 3 महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही धुमाळ उपजिल्हाधिकारी (समन्वय) बीड हे संचिका लपवून ठेवत केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नामदेव टिळेकर व श्रीनिवास मुळे निलेश बागडे यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत.
मावेजा वाटपातील भ्रष्टाचारी अधिकारी–कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये यासाठी उपजिल्हाधिकारी धुमाळ प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समक्ष तक्रारीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची मांडणी न केल्याने प्रकरण निकाली निघण्यास विलंब होत आहे. सदर प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार आहे.
अजय सरवदे ,जिल्हाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी बीड

