बीड –ड्रीम एलेव्हन व रमी ॲपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलिसच चोर बनल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली.पोलिस अधीक्षक कार्यालयातून 12 व्होल्टच्या 58 बॅटऱ्या चोरल्या. त्यात जामीन होताच पुन्हा सात दुचाकी या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने चाेरल्या.
अमित मधुकर सुतार वय 35 वर्ष, रा. खोकरमोहा, ता. शिरूर कासार अस सहाय्यक फौजदाराचं नाव आहे. ऑनलाइन जुगारात पैसे हरल्याने कर्ज फेडीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. अमित सुतार हा पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात कार्यरत होता. त्याने डिसेंबर 2024 मध्ये कार्यालयातील 10 बॅटऱ्या चोरल्या होत्या.
अधिक तपासात त्याच्याकडे 58 बॅटऱ्या आढळल्या होत्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने स्वराज कोंडीराम बोबडे वय 26 वर्ष, रा. अंबिकानगर, बीड, हितोपदेश गणेश वडमारे 30 वर्ष, रा. अंकुशनगर, बीड या दोन साथीदारांसह सात दुचाकी चोरल्या. त्याला सोमवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे शहर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने अमित सुतार याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. चार दुचाकी चोरीचे गुन्हे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद आहेत. त्यामुळे त्याला नंतर शिवाजीनगर पोलिसांकडेही तपासासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

