एसपींची अपरिहार्यता की पुढाऱ्यांकडून मुस्कटदाबी
बीड –पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत म्हणजे एक शिस्तप्रिय, लाच न घेणारे अधिकारी अशी त्यांची थेट ओळख.जिल्ह्यात अलीकडच्या काळात जे घटकप्रमुख आले ते व्यवस्थेला मानणारे कमी आणि पुढऱ्यांपुढे ‘जी हुजर’ करणारे अधिक होते. कॉवत यांच्याकडून जिल्हावासियांचा आतापर्यंत भ्रमनिरास झाला नाही. पण आजच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पाहता पोलीस अधिक्षक यांची अपरिहार्यता झाली की राजकीय पुढाऱ्यांकडून मुस्कटदाबी यावर एक नजर टाकणे महत्वाचे ठरणार आहे.
गेवराईचे प्रभारी असलेले प्रवीणकुमार बांगर यांची बीडच्या शिवाजीनगरला बदली झाली. तर शिवाजीनगरचे प्रमुख किशोर पवार गेवराईचे प्रभारी. बरं यासोबतच ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना उचलून त्या ठिकाणी पेठ बीडचे अशोक मुदिराज यांना संधी देण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही मोठे कारण नसताना थेट चार अधिकारी बदलले यामुळे सर्वांना धक्का बसला. विशेष म्हणजे किशोर पवार बीड जिल्ह्यात येऊन जेमतेम झाले असतील चार ते पाच महिने. या कालावधीत त्यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. कायदा आणि सुव्यवस्था यावर तर बोलायचेच नको. कारण यश ढाका हत्या झाली ते यांच्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर.नंतर प्रकरण शेकते की काय म्हणून ते थेट रजेवर गेल्याच्या चर्चा होत्या. आता अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना थेट गेवराई सारखे ठाणे एसपी साहेबांनी दिले.आता त्यांच्या पुढे असणारे आव्हान किती मोठे आहे हे येणाऱ्या कळात कळेलच. बरं याशिवाय आणखी एक बदली चर्चेस पात्र आहे, ती म्हणजे मारुती खेडकर यांची. ज्या पोलीस अधिक्षक यांना मारुती खेडकर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख व्हावे असे वाटतं होते, (मात्र जात तिथे त्यांना कदाचित आडवी आली असावी) त्यांना शिवाजीनगरवरून ग्रामीण पोलीस ठाणे देण्यात आले. खेडकर यांच्या कामावर आनंदी असल्याने त्यांना ग्रामीण पोलीस ठाणे मिळाले होते. मात्र पाच महिन्याच्या आतच आता कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसताना त्यांना पेठ बीडला हलविण्यात आले. (सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना घटक प्रमुखांनी अर्ज घेतलेच असतील, ज्यामुळे उद्या काही झालेच तर आपली यात कोणतीही भूमिका नाही हे दाखवायला ते मोकळे झाले.) दरम्यान एकीकडे पोलिसांच्या छातीवरून नेमप्लेटच्या माध्यमातून जात काढायची. नेमप्लेटमध्ये स्वतःचे कौतुक करून घ्यायचे. पण अधिकाऱ्यांना नियुक्ती देताना पुन्हा डोक्यात जात ठेवूनच नियुक्त्या द्यायच्या असला फंडा तर पोलीस अधिक्षक यांच्या डोक्यात नाही ना असा प्रश्न कोणालाही पडावा असा आहे.मुंबई वरून आलेल्या अधिकाऱ्याला वरिष्ठांचे फोन आले की एलसीबीत थेट संधी मिळते.पण एसपींचे उंबरे झीजविणाऱ्या, १०० हून अधिक कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्याला इथे संधी मिळत नाही कारण तिथे ही जात आडवी येतं असावी. ज्या ग्रामीण पोलीस ठाण्याला क्रमांक १ वर आणले त्या ठाण्याचे सपोनि यांना संधी द्या म्हणून वारंवार आपली योग्यता दाखवावी लागते तिथे मात्र इतरांना विना योग्यता संधी देण्याचे धारिष्टय एसपी दाखवत असतील तर हे उदाहरणं आणि आताचे म्हणजे गेवराई आणि ग्रामीण पोलीस ठाणे प्रमुखाच्या पाच महिन्यात झालेल्या बदल्यांचे उदाहरणं एसपींची झालेली अपरिहार्यता आहे की पुढाऱ्यांकडून झालेली मुस्कटदाबी यावर मात्र उत्तर मिळायला मात्र मार्ग नाही.

