माजलगाव — पतसंस्था सोसायटी या माध्यमातून खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. माजलगाव मधील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारांची 23 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दामोदर घाटूळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर शिंदेसह 20 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर गणपतराव घाटूळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. त्यांच्या घराशेजारी किरायाने राहणारे शिवप्रसाद सक्राते, विठ्ठल सक्राते व रमेश यादव यांनी घाटूळ यांच्या घरी जाऊन मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी पतसंस्थेत तब्बल 27 लाख रुपये गुंतवले. मात्र पतपेढी बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावरून गुंतवणुकीची काही रक्कम काढून घेतली. परंतु दामोदर घाटूळ यांना पैशाची गरज पडल्यामुळे त्यांनी पतसंस्थेकडे आपल्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी केली. विविध कारण देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. दरम्यान 23 लाख रूपयांची रक्कम व्याजासह परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार घाटूळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणी दामोदर घाटुळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास निवृत्ती सौंदर, भागवत संभाजी गंगाञे, विशाल श्याम गोरे, केशव साहेबराव जोगडे, स्वाती विठ्ठल सक्राते, जनाबाई अनंतराव कदम, अशोक रतन चिगुरे, मोतीराम केशव शिरसाट, परमेश्वर लक्ष्मण कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सकारात्मक, विठ्ठल संक्राते, उद्धव केशव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके, रमेश दगडूबा यादव, रुस्तुम काळे या वीस जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद सर्जेराव सक्राते यांच्यावर यापूर्वी तीन अपहाराचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय केरबा माकने हे करत आहेत.