Home आरोग्य चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी २४ कोटींचा निधी मंजूर

चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी २४ कोटींचा निधी मंजूर

0
17

प्रशासकीय मान्यता मिळाली; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार

बीड — तालुक्यातील चौसाळासह परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून २४ कोटी ४५ लक्ष ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बुधवारी (दि.९) अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

चौसाळा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी आणि जागा उपलब्धतेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली निधीसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे चौसाळा परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच मिळू शकणार आहेत. आतापर्यंत अनेकवेळा रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागत होते. मात्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन झाल्यानंतर विविध उपचार, तपासण्या व तातडीच्या सेवा याठिकाणीच उपलब्ध होतील. या रुग्णालयासाठी निधी मिळवण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी ही मागणी शासनदरबारी मांडली होती. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे चौसाळा परिसरातील आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून, गावातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या भागातील लोकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून, येत्या काही महिन्यांत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व सुविधा उभारणीचे काम वेगात सुरू होईल, अशी माहितीही मिळत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

06:01