आष्टी — ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कागदपत्र पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे उघडकीस आली. या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज फाईल व 40 ते 45 रजिस्टर जळून खाक झाले. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात असून अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे
सुलेमान देवळा येथील एका दारूने झिंगलेल्या व्यक्तीने शुक्रवारी रात्री हातात कुर्हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.महत्त्वाचे दस्तऐवज अस्ताव्यस्त करत पेटवून दिले. या लावलेल्या आगीत 40ते 45 रजिस्टर व महत्वाचे दस्तऐवज,फाइल जळून खाक झाले. अशी माहिती गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना दिली.दरम्यान, आज ग्रामविकास अधिकारी मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव सुखदेव भादवे, सचिन भगवान खोरदे, नवनाथ,एकनाथ भोजे या पंचाच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मुळीक यांनी सांगितले.सरपंचाकडून आर्थिक पिळवणूक
येथील सरपंच हे वैयक्तिक कामासाठी व घरकुलाच्या हप्त्यापोटी पैशाची मागणी केल्याशिवाय हप्ता देत नाहीत. त्याच्याकडून सातत्याने मनमानी कारभार सुरू आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा न झाल्यामुळे, आपली व्यथा मांडायची कोणापुढे या भावनेतून कदाचित एखाद्या ग्रामस्थांने हि घटना केली असावी, असे समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी सांगितले.

