गेवराई (बीड ) — तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौंडगाव शिवारात किरकोळ जमीन वादातून 57 वर्षीय शेतकऱ्याची काठ्या आणि दगडांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मृत शेतकऱ्याचे नाव अर्जुन साहेबराव माळी असे असून, या प्रकरणी गेवराई पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली.

काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन माळी यांनी गौंडगाव शिवारातील गट क्रमांक 155 मधील गायरान जमिनीचा काही भाग मशागतीसाठी वापरात घेतला होता. या जमिनीच्या शेजारी आरोपींची शेती असल्याने दोन्ही बाजूंमध्ये आधीपासून वाद होता.
घटनेच्या दिवशी सायंकाळी, माळी हे शेतात गेले असता आरोपींनी त्यांना घेरले. शेताचा बांध फोडल्याच्या कारणावरून वाद वाढला आणि आरोपींनी काठ्या व दगडांनी अमानुष मारहाण केली.

उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी अवस्थेत माळी यांना प्रथम गेवराई येथील सरकारी रुग्णालयात आणि नंतर बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी मृताच्या मुलगा पपेश माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मधुकर नायबा शिंदे,
मनोहर मधुकर शिंदे तसेच एका विधी संघर्षग्रस्ता विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5) आणि 352 अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब पवार करत आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधात चक्र फिरवली असता आरोपींनी पोलिसांना थांगपत्ता लागू नये यासाठी आपले मोबाईल बंद करून ठेवले होते. दरम्यान पोलिसांना मधुकर नायबा शिंदे व मनोहर मधुकर शिंदे हे दोघे बीडच्या बार्शी नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मोठ्या शिताफीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या दोन्ही आरोपींना अवघ्या सहा तासातच बेड्या ठोकल्या आहेत.




