मुंबई — आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘सुपरमून’ दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत माहिती दिली.
चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पृथ्वीपासूनची जवळीक कमी होऊन ते अंतर केवळ ३ लाख ५६ हजार ९६२ किलोमीटर राहणार आहे. चंद्र पृथ्वीच्या एवढा जवळ आल्यानं तो आकाशात नेहमीपेक्षा तब्बल १४ टक्के मोठा दिसणार आहे. एवढंच नाही तर या जवळकीचा परिणाम त्याच्या चमकदारपणावरही होणार असून चंद्राचा प्रकाश जवळपास ३० टक्क्यांनी वाढून तो जास्त तेजस्वी आणि मनमोहक दिसण्याची शक्यता आहे.या विलक्षण दृश्याचा आनंद संपूर्ण भारतभरातील नागरिकांना घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी ५.१८ वाजता पूर्व दिशेला उगवेल आणि त्यानंतर रात्रभर आकाशात त्याचे दिमाखदार रूप पाहायला मिळणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी ७.१४ वाजता पश्चिमेकडे मावळेपर्यंत त्याचे दर्शन घेता येईल. जवळपास १४ तासांहून अधिक काळ आकाशात हा चमकदार पूर्ण चंद्र झळाळत राहणार आहे.
असा तेजस्वी आणि मोठा चंद्र दिसण्याचा हा योग दुर्मिळ असतो. पुढील सुपरमून भारतातून २४ डिसेंबर २०२६ रोजी पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी आणि आकाशनिरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची रात्र अतिशय खास पर्वणी ठरणार आहे.

