पुणे — पुण्यातील मुंढवा जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू या प्रकरणात जो साक्षिदार आहे, त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी ‘कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी’द्वारे परस्पर भूखंड लाटला आणि ३०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
या भूखंडावर ‘अनंत वन’ हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे ‘डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजी असोसिएशन’चे कार्यालय स्थापन्यात आले असून प्रकल्पातील इतर मालमत्तांची थेट चालू बाजारभावमुल्यानुसार (रेडीरेकनर) विक्री करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंढवा जमीन घोटाळ्या पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला साहिल प्रधान आणि इतर सदस्यांची नावे या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणातही आढळून येत असल्याचे कुंभार यांनी सांगितले.
कुंभार म्हणाले, ‘पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे दोन एकरचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून ६० वर्षाच्या दीर्घ मुदतीवर कल्पतरू प्लांटेशन कंपनीला देण्यात आला. कालांतराना या ठिकाणच्या १५ हजार चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढवून ६३ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेली इमारत उभारण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) नोंदणी क्रमांक पी ५२१०००१४४९४ या क्रमांकाद्वारे याची नोंदही उपलब्ध आहे. वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्याव देण्यात आली असताना या जागेची डेक्कन शुगर आणि पुन्हा कल्पतरू प्लांटेशन असे हस्तांतरण दाखविण्यात आले. तसेच जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील सहा मजले परस्पर विक्री करण्यात आले आहे. ज्याची किंमत ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.’डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला ‘कुलमुखत्यार’ देण्यात आले. प्रधान ही व्यक्ती मुंढवा जमिन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शितल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारांत साक्षिदार आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा या प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित तीन कंपन्यांच्याच निविदा येणे, त्यापैकी कल्पवृक्ष कंपनीला अंतिम निविदा मंजूर होणे, कंपनीने थेट जागा विकसित करणे हा योगायोन नसून ठरवून हा ठरवून भूखंड लाटण्याचा प्रकार आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतरही कंपन्यांमध्ये एकत्रित संचालक आहेत.
जागेवर २५ कोटींचे कर्जही
मुदतीनुसार भाडेतत्वावर जागा दिल्यानंतर संबंधित जागेवर कोणताही वित्त पुरवठा किंवा बँकेचे कर्ज काढता येत नाही. परंतु या जागेवर २५ कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. सन २०१७ पासून या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आणि नुकतेच या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली. कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे कुंभार यांनी नमूद केले.
महारेराच्या आदेशाला केराची टोपली
‘महारेरा’ यांनी देखील या जागेची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार समोर आल्याने हा प्रकल्प स्थगित ठेवण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. तसेच प्रकल्पाचे बँक खाते गोठवत प्रवर्तकांनी प्रकल्पाचे अनुपालन पूर्ण करेपर्यंत प्रवर्तकास खरेदी सोबत साठेकरार आणि विक्री करार करण्यास मज्जाव असल्याच्या सूचना दिल्या. मात्र या ठिकाणी ‘अनंत वन’ हा प्रकल्प या ठिकाणी उभा केला असून शासनाच्या विरोधात लढणाऱ्या कंपनीच्या प्रकल्पांमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यालय असणे कितपत योग्य आहे, असेही कुंभार यांनी सांगितले.

