बीड — पोलीस दलात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरोधात कारवाईचा निर्णय घ्यायचा, ढोल वाजवून गाजावाजा करायचा अन काहीच दिवसात पुन्हा तो निर्णय बदलून क्लीन चीटही आपणच द्यायची असा “घराला नाही कौल आणि रिकामा डौल” असा प्रकार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळू लागलं आहे. वाळू प्रकरणात लाच घेताना माजलगाव पोलीस ठाण्याचा कर्मचारी 28 जानेवारी रोजी एसीबी ने रंगेहात पकडला यावर कारवाई करत कांवत यांनी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची उचल बांगडी करून नियंत्रण कक्षात बदली केली. अशीच घटना पाटोदा या ठिकाणी सुद्धा घडली होती. तिथेही कर्मचारी लाच घेताना पकडला गेला. त्यावेळीही सोमनाथ जाधव या पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र हे दोन्हीही निर्णय आता बदलण्यात आले असून माजलगाव माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा कारभार पोनि राहूल सूर्यतळ यांना पुन्हा देण्यात आला तर सहा महिने पोनि सोमनाथ जाधव यांना चुकीच्या निर्णयामुळे कंट्रोलला बसावे लागले म्हणून बक्षीस म्हणून बीड ग्रामीण पोलीस ठाणे त्यांच्या हवाली करण्यात आलं तर पोनि अशोक मूदीराज यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आलं.
सहा महिन्यापूर्वी वाळू वाहतूक करणारा कडून लाच घेताना पाटोदा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली म्हणून जबाबदार धरत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ठाणे प्रमुख सोमनाथ जाधव यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा संदेश देऊन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाहवाई कांवत यांनी मिळवली. त्यानंतर 28 जानेवारी 2026 रोजी वाळू वाहतुकीत पोलिसांची हप्ते खोरी चालत असल्याचा प्रकार माजलगाव मध्ये उघडकीस आला. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अमोल कदम खासगी इसमासह वीस हजाराचं लाचेच शेण खाताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगहात पकडला. मग काय पोलीस अधीक्षकांना पुन्हा नव्याने दवंडी पिटवण्याची व कर्तव्यदक्षतेचा आव आणण्याची आयती संधी चालून आली. जाधव यांच्यावर कारवाई केली तशीच कारवाई करत तडकाफडकी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले. ठरल्याप्रमाणे पोलीस अधीक्षकांची माध्यमांनी पाठ थोपटली. मोठा गाजावाजा झाला गेला. दरम्यान या बदलीच्या घटनेला आठ नऊ दिवसाचा कालावधी उलटत नाही तोच पोलीस अधीक्षकांना साक्षात्कार झाला. लाचखोरीच्या प्रकरणात पोनि राहुल सूर्यतळ यांचा काय दोष असं जबाबदार धरण योग्य नाही. म्हणून आपला पूर्वीचाच निर्णय बदलून पुन्हा त्यांना सन्मानाने माजलगाव शहर पोलीस ठाणे बक्षीसी म्हणून देण्यात आलं.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबल नाही तर विनाकारण आपण पोनि सोमनाथ जाधव यांना जबाबदार धरून सहा महिने कंट्रोल ला बसवले याची जाणीव देखील झाली गेली. या सगळ्याच परिमार्जन म्हणून त्यांच्याकडे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला. या संदर्भातले आदेश आज काढण्यात आले. एका मातब्बर आमदाराच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या बाबतीत निर्णयाचा फेरविचार पोलीस अधीक्षकांना करावा लागला. हाच तो साक्षात्कार होता अशी कुजबुज पोलीस दलात सुरू झाली आहे.याबरोबरच आणखी एका आमदाराच्या सांगण्यावरून पेठ बीड पोलीस ठाणे विविध अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या व कायदा सुव्यवस्थे ची विल्हेवाट लावणाऱ्या पो नि अशोक मूदीराज यांना सन्मानाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात आला होता. या बदली प्रकरणाला ही फार दिवस झालेले नाहीत. मात्र त्यांची बदली कंट्रोलला करून जनतेवर मात्र पोलीस अधीक्षकांनी उपकार करून जनतेला मोकळा श्वास मिळवून दिला आहे. पोलीस अधीक्षकांना या निर्णयासारखीच उपरती देऊन कधी अवैध धंद्यांना आळा घातला जाईल, सर्वसामान्यांच्या जीवनात न्याय कधी मिळेल? खून दरोडे चोऱ्या मारहाणी यासारख्या घटनांना देखील आळा घातला जाईल म्हणून जनतेला देव पाण्यात घालून बसण्याची वेळ आली आहे.
अशा आपणच घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा दुसरा आदेश काढणं ही पोलीस अधीक्षकांना उमगलेली चूक होती की पुन्हा “ये रे माझ्या मागल्या” या म्हणीप्रमाणे राजकारणी लोकांचे कठपुतले बाहुले म्हणून काम करू लागले आहेत असा आरोप देखील होऊ लागला आहे. वारंवार बदलल्या जाणाऱ्या निर्णयामुळे काहीही असो “लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार कांवत साहेब अजब तुमचा कारभार ” असं गाव पारावर गमतीने म्हटलं जाऊ लागला आहे.

