बीड — विकासाला शेतकऱ्यांचाही विरोध नाही मात्र स्वतःची घर जाळून होणाऱ्या विकासाला का विरोध करू नये? या विरोधालाच गावगुंडांच्या परिभाषेत नेऊन ठेवणार तुघलकी फर्मान पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढला आहे. एकीकडे शेतकरी निसर्गाशी दोन हात करत आहे तर दुसरीकडे विकासाच्या नावाखाली घर उध्वस्त करणार परचक्र शेतकऱ्यांच्या घरावरून वरवंटा फिरवत आहे. विकासाची काळजी आपल्यालाच आहे असा आव आणून कंपन्यांचे रखवालदार आहोत अशा जहागीरदारी थाटात लोकशाहीला मूठमाती देत एसपींनी रझाकारी फर्मान काढून शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवली आहे. यामुळे एसपी विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

(शेतकऱ्यांची मान अडकित्यात अडकवणार हेच ते एसपींच फर्मान)
ही तर एसपींची रझाकारी मोगलाई; शेतकऱ्यांच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवण्याची घाई !!✒️ भाग -१
नवनीत कांवत जिल्ह्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात काहीसा का होईना फरक पडेल अशी अपेक्षा होती मात्र ती एका फर्मानाने धुळीला मिसळली गेली. पवन ऊर्जा, सौरऊर्जा कंपन्यानी जिल्ह्यात नंगानाच सुरू केला आहे. या नंग्या नाचाला जिल्हाधिकाऱ्यापासून प्रशासनातील प्रत्येक यंत्रणेच पाठबळ भेटत आहे. तीच स्थिती पोलीस यंत्रणेची देखील झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाची जणू काही आपल्यालाच काळजी आहे. अशा थाटात एसपींनी लोकशाहीला मूठ माती देत शेतकऱ्यांची घर बरबाद झाली,ती देशोधडीला लागली तरी विकास झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. कंपन्यांना त्यांच्या कामात त्रास होऊ नये त्यांना संरक्षण मिळावं यासाठी गावगुंडांच्या परिभाषेत शेतकऱ्यांना नेऊन ठेवलं. शेतकऱ्यांनी स्वतःच हित कुटुंबाच हित जपणं देखील त्यामुळे पाप होणार आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून कंपनीची लोक गाड्या घेऊन गेले. रस्त्यात आडवी येणारी घर पाडली, अधिग्रहित जमिनीपेक्षा जास्त क्षेत्रावर कब्जा केला,अधिग्रहित जमिनीचा मावेजा दिला नाही, कंपन्यांच्या गुंडांनी घर जाळली तरी काहीच फरक पडणार नाही. या उलट कंपन्यांना कायद्याचं संरक्षण मिळणार आहे. या अन्यायाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात कंपन्यांच हित जपण्यासाठी पोलीस अधिकारी एसपींच्या या तुघलकी फर्मानामुळे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून बिन भाड्याच्या खोलीत त्यांना बसवायला रिकामे होणार आहेत. निसर्गाशी दोन हात करत जीवन जगायचं सावकाराची देणी द्यायची, मुला बाळांना दोन घास खाऊ घालून त्यांचं शिक्षण करायचं की या परचक्राला थोपवण्यासाठी कर्जबाजारी होऊन न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्यात अडकायचं की झालेला अन्याय मुकाट सहन करायचा असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था निर्माण करायला आले आहेत की शेतकऱ्यांची घर उध्वस्त करून कंपन्यांची दलाली करायला आले आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. या आरोपांच खंडन देखील करण्याचं तोंड त्यांना राहिला नसल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आमची बाजू ऐकून घ्या अशी आर्त हाक मारून देखील ती ऐकून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याची मानसिकता कंपन्यांपुढे शरणागत झालेल्या एसपींना निर्माण झाली नाही. एस पी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय”या पोलीस प्रशासनाच्या ब्रीद वाक्याला येणाऱ्या काळात तरी प्रामाणिक राहणार आहेत की नाही असा प्रश्न त्यांच्या फर्मानामुळे निर्माण झाला आहे.
“कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय”हे एस पीं च ब्रीद
शेतकऱ्यांची बाजू तसेच त्यांच्यावर होणारा अन्याय ऐकून घ्यावा यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊन एसपींना निवेदन दिलं. मात्र एसपींनी शेतकऱ्यांच म्हणण ऐकून न घेता पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांच्या गुंडगिरीला पाठबळ देणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे “कंपनी रक्षणाय, शेतकरी निग्रहणाय” हे ब्रीद घेऊन नवनीत कावत चालले आहेत. असं म्हणायला हरकत नाही. कंपन्यांची बाजू घेण्याची एसपींची भूमिका त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय निर्माण करणारी आहे
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
सामाजिक कार्यकर्ते

