मुंबई — शिवसेनेतील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांवर निशाणा साधत संबंधित मतदारसंघातील जनतेची जाहीर माफी मागितली.

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि माझ्या आवाहनावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला मतदान केले. पण ज्यांना जनतेने निवडून दिले, तेच आता पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातील जनतेची मी माफी मागतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका करताना ठाकरे यांनी लोकशाहीबाबतही चिंता व्यक्त केली. “लोकांचा आता लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. हे असेच सुरू राहिले तर देश अराजकतेकडे जाऊ शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.
पक्षप्रमुख पदावरून होत असलेल्या आरोपांवर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला पदाची हाव असती तर मी विधान परिषदेत गेलो असतो. गेली अनेक वर्षे मी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. माझ्यावर कार्यकर्त्यांना वेळ देत नसल्याचा आरोप केला जात आहे. जर शिवसैनिकांना तसे वाटत असेल तर मी पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे.”
मात्र शिवसेना चुकीच्या हातात जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “ही सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या किंवा चोरट्यांच्या हाती द्यायची नाही. एखाद्या निष्ठावान शिवसैनिकाला पक्षप्रमुख करण्याची वेळ आली तरी मी तयार आहे. मी खचणारा नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा आहे,” असे ठाकरे म्हणाले.

