शेतकऱ्यांना आधार देत भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन
बीड — जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी सह इतर पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आ. संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.२०) रोजी प्रशासनाला घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त केले.

वेधशाळेने मागील काही दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस व गारपीटीचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे. यानंतर गुरुवारी (दि. १९) दुपारी बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपळनेर परिसरासह बीड मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला. या पाऊस आणि गारपीटीने हाताशी आलेले गहू, ज्वारी, हरभरा यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अंबा, टरबूज, खरबूज, चिकू आदी फळबांगाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने लिंबागणेश (ता. बीड) येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांचा टरबूजाचा पूर्ण प्लॉटचे नुकसान झाले आहे. गारपीटीने मार लागून काही फळे फुटली तर अनेक फळे मार लागून खराब झाली आहेत. असेच नुकसान अनेक ठिकाणी टरबूज आणि खरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मिळताच आ. संदीप क्षीरसागर यांनी आज शुक्रवारी (दि.२०) सकाळीच धाव घेत चक्क बांधावर जाऊन आ. संदीप क्षीरसागर यांनी लिंबागणेश, पोखरी, पिंपरनई येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच या नुकसानीचे पंचनामे करुन घेऊन शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी राजेंद्र मस्के, तहसीलदार चंद्रकांत शेळके व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

